तरुणांची ऊर्जा होऊ शकते प्रलयाचे कारण! मराठी साहित्य संमेलनात डॉ. रवींद्र शोभणे यांचा इशारा
संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा इशारा, अमळनेर येथे 97व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
सागर जावडेकर/ अमळनेर
तरुणांची ऊर्जा ही वाहत्या पाण्यासारखी असते. ती सृजनाची जशी गंगोत्री होऊ शकते तशीच ती प्रलयाचे कारण होऊ शकते, असा खणखणीत इशारा 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी दिला. शिक्षणाचा बाजार मांडणारी मंडळी आज शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसलेली आहेत व जो डोनेशन देऊ शकतो, तो प्राध्यापक होऊ शकतो, हे जळजळीत वास्तव डॉ. शोभणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले व शेतकऱ्यांप्रमाणेच उद्या सुशिक्षित तरुण-तरुणी आत्महत्या करू लागले तर त्याचे खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे, असा खडा सवाल त्यांनी सरकारला केला.
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटक म्हणून लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. भाषा व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, उद्योगपती अशोक जैन, स्वागताध्यक्ष गिरीश महाजन, कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मंत्री गुलाबराव पाटील, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पाणे, समन्वयक डॉ. नरेंद्र पाठक इत्यादी अनेक साहित्य व सामाजिक चळवळीतील दिग्गज मंडळी उपस्थित होती. दरम्यान, उपाध्यक्ष रमेश वंसकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
आजचा तरुणवर्ग भाषा, संस्कृतीपासून दुरावतोय
संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या घणाघाती भाषणातून राज्यकर्त्यांच्या ढिसाळ कारभारालाच हात घातला. आजचा तरुणवर्ग हा भाषा व संस्कृतीपासून दूर जातोय याची कारणे शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अनेक बोली भाषा या मरत चालल्या आहेत, हा देखील धोक्याचा इशारा आहे. मराठीला फार मोठा इतिहास आहे. भाषा हे जगण्याचे साधन, संस्कृतीची पाठराखण करणारे एक उत्तम माध्यम आहे. तरीदेखील माणसाला विशेषत: आजच्या युवा पिढीला आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आवश्यक असलेल्या भाषेकडे वळावे लागत आहे. तरुणाईचा अंत किती पाहणार आहात? असा खडा सवाल करताना संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी वाढती बेकारी हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे. आजच्या पिढीचा व समाजाचा तो एक ज्वलंत प्रश्न आहे. हा राजकीय विषय ठरवून साहित्यिकांनी त्याचा आपल्या भाषणात उल्लेख करण्याचे कारण नाही, असे कोणीही म्हणू शकतो. मात्र लेखक हा शब्दांशी झटत असताना तो या शब्दांमधील वेदना याच समाजातून शब्दबद्ध करीत असतो. सामाजिक भान जपणारा, समाजातील प्रश्न समजून घेत त्यावर आपल्या लेखनातून चिंतन करणारा राजकीय समकालाचा अन्वय विविध पातळ्यांवर लावू पाहणारा आपण एक लेखक असल्याने या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असे डॉ. शोभणे म्हणाले.
नव्वदनंतर आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खासगीकरणाने आपल्या शैक्षणिक जीवनात आमूलाग्र क्रांती केली आणि सरकारने मात्र आता काही करायचे शिल्लक नाही, या हेतूने चक्क पाठ फिरविली. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मात्र सरकारी शिक्षण क्षेत्राचे चित्र पाहता प्रचंड निराशा पदरी येते. प्रामाणिक आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी शिक्षण सेवक म्हणून नवा पायंडा पाडला गेला आणि तीन वर्षे उमेदवारांचे जगणे जणू हातावर आणून पानावर खाण्यासारखे केले आहे. उच्च महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत. ही कशाची उदासिनता आहे? हजारो तरुण प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहता पाहता पन्नाशीला आलेले आहेत व सरकारी उदासिनतेचा हा कळस आहे, अशा शब्दात डॉ. शोभणे यांनी सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर औदासीन्यतेला आणखी एक वाळवी लागलीय व ती म्हणजे डोनेशनची. उच्च महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी उच्चशिक्षित संपूर्ण अर्हता असलेल्या उमेदवाराला लाखो रुपयांचे डोनेशन द्यावे लागत आहे. यावर कोणाचा अंकुश आहे, असा खडा सवाल डॉ. शोभणे यांनी केला.
युवावर्ग पेटून उठला तर आवरणे कठीण
हुशार प्रतिभासंपन्न तरुण-तरुणी खासगी महाविद्यालयात रु. दहा हजारांच्या वेतनावर नोकऱ्या करीत आहेत, हे चित्र कधी बदलणार? आज आपण शिक्षणाच्या गुणवत्तेच्या स्खलनावर चर्चासत्रातून तावातावाने बोलतो पुढे काय ? हा विषय साहित्याच्या कलाकृतीचा शोकात्म विषय आहे व यातूनच पुढे सुशिक्षित बेरोजगार युवावर्ग आत्महत्या करू लागला तर काय करता ? असा सवाल करून हा युवावर्ग पेटून उठला तर त्याला आवरताना कठीण होऊन जाईल, असा इशारा डॉ, शोभणे यांनी आपल्या भाषणातून दिला.
मराठी ज्ञानभाषा व्हावी
मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी अशी भावना संपूर्ण मराठी जनतेची आहे आणि तिला ज्ञानभाषा करण्यासाठी सर्वप्रथम शासकीय स्तरावरूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन डॉ. शोभणे यांनी आपल्या भाषणातून केले. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी असावा. राजभाषा म्हणून आपण ज्या मराठीचे प्रासंगिक गोडवे गातो त्या भाषेला अभ्यासक्रमात दुय्यम तिय्यम स्थान देणे ही आपल्या भाषा विषयक उदासिनतेची साक्ष देणारी गोष्ट आहे आणि याकामी केवळ शासनाला जबाबदार धरण्यावाचून पर्याय नाही, असेही शोभणे यांनी आपल्या भाषणातून सरकारला सुनावले. सानेगुरुजी, बहिणाबाई यांना डॉ. शोभणे यांनी भावसुमनांजली वाहिली.
अमळनेर येथे साने गुरुजी स्मारक व्हावे : अजित पवार
या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या एका वैशिष्ट्यापूर्ण शैलीमध्ये आयोजकांचा हलक्याच स्वरुपात समाचार घेतला. त्याचबरोबर साने गुरुजींच्या या कर्मभूमीमध्ये साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने होणारे अ. भा. साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी होईल. साहित्यिकांकडून नवोदिताना ऊर्जा प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली. प. पूज्य साने गुरुजी यांचे या भागात एक सुंदर असे व त्यांच्या विचारांना जुळणारे अशा पद्धतीचे एक भव्य दिव्य स्मारक व्हावे याकरिता एक चांगला प्रस्ताव स्थानिक मंत्र्यांनी करून द्यावा. लवकरच महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात आपण ते संमत करून अर्थसंकल्पात तसा प्रस्ताव समाविष्ट करून टाकतो, असे आश्वासन दिले.
100 वे साहित्य संमेलन दिमाखात होण्यासाठी सरकार प्रयत्न करील
राज्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच साहित्य कला व संस्कृती तसेच क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून शहरांचा विकास झाला तरच ही शहरे श्रीमंत शहरे म्हणून ओळखली जातील. साहित्य संमेलनाला गौरवशाली इतिहास असून पुढील दोन वर्षानंतर 100 वे साहित्य संमेलन होईल ते दिमाखात पार पाडण्यासाठी आपले सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.
अमळनेर शहराचा उल्लेख करताना याच शहरात विप्रो कंपनी सुरू झाली.
तत्त्वज्ञान केंद्राच्या जागतिक पातळीवर नावलौकिक आहे तो निर्माण केला बहिणाबाईनी. आजकाल वाचन संस्कृती हळूहळू लोप पावतेय याची खंत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुस्तके वाचण्याऐवजी आता स्क्रीनवर पुस्तके, साहित्य वाचण्याची एक नवी संस्कृती आणि नवी पिढी आपल्याकडे घडतेय, असे सांगितले. त्यांनी साहित्यिक आणि विचारवंतांना व्यक्त होण्याचे आवाहन केले. राज्याच्या विकासासाठी काय बरे, काय वाईट याबाबत साहित्यिक मंडळीनी आपले विचार मांडले पाहिजेत.
मराठी भाषा विकासासाठी मंत्री दीपक केसरकरांकडून घोषणांचा वर्षाव
यावेळी भाषा विकासमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अ. भा. साहित्य संमेलनास केवळ 55 लाख रुपये देण्यात येत होते. आपल्या सरकारने ते रु. 2 कोटी केले. आता यानंतर तालुकास्तरावरील साहित्य संमेलनाकरिता रु. 2 लाख तसेच संत वाड:मय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी रु. 25 लाख देण्यात येतील, असे ते म्हणाले. याशिवाय ग्रामीण पातळीवर युवक मंडळे स्थापन केली जातील आणि मराठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रु. 10 हजारांचे मानधन त्यांना देण्यात येईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकार साहित्यिक व भाषा विषयक पुरस्कार देते त्यासाठी एक समिती आपल्या पातळीवर योग्य व्यक्तीचा विचार करूनच पुरस्कार देईल. सरकार स्वत: त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मुंबईत लवकरच रु. 250 कोटी खर्चून भव्य अशा स्वरुपाचे मराठी भाषा भवन उभारण्यात येईल यामध्ये मराठी विषयक सर्व मंडळे आणि भाषा विषयक कार्यालये एकत्र येतील. तिथेच बाहेर गावातून येणाऱ्या साहित्यिकांची निवासव्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
साहित्यातून समाजात कसे वागावे याची शिकवणूक : सुमित्रा महाजन
उद्घाटक या नात्याने लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांचेही या प्रसंगी समयोचित भाषण झाले. आपल्या भाषणातून त्यांनी राजकारण्यांचीही फिरकी घेतली. याच भूमीतून काळ्या मातीत हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून ना. धों. महानोर यांनी फार मोठी साहित्य सेवा बजावली. आपल्या अहिराणी भाषेतून जीवनाचे मर्म व तत्त्वज्ञान मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांनी खानदेशाचे साहित्य समृद्ध केले. राजकारणातील मंडळीना साहित्याचा गंध नसतो, असे आज म्हणता येणार नाही. मुळात जनतेच्या दरबारी जाताना मंत्री, आमदार व राजकीय नेत्यांनी अगोदर अभ्यास केला पाहिजे. पुस्तके वाचणे आवश्यक आहे. आपण देखील अनेक पुस्तके वाचत असते, असे त्या म्हणाल्या. उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य सापडते. तुमचं मन शुद्ध तर तुम्ही जीवनात कधीही अपराधी होऊ शकत नाही आणि पुस्तके जगाला जवळ आणण्याचेही काम करतात, असे भावोद्गार सुमित्रा महाजन यांनी काढले.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष व महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी प्रास्ताविक केले. महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर डॉ. उज्ज्वला मेहंदळे यांनी आभार मानले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे व त्यांच्या पत्नी या दोघांचेही सन्मान करण्यात आले. संमेलनाची सुरुवात अमळनेर गीताने तसेच जयजय महाराष्ट्र माझा या गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध सूत्रनिवेदन श्रीमती मृण्मयी भजक व दिगंबर महाले यांनी केले. संमेलनास अनेक साहित्यिक व आसपासच्या परिसरातील प्राध्यापक मंडळी उपस्थित होती.