दहावीचा निकाल 95.35 टक्के
गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेट्यो यांच्याकडून जाहीर : दहावीची पुढील वर्षाची परीक्षा 2 मार्च 2026 पासून
पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) मार्च 2025 मध्ये घेतलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून 95.35 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. एकूण 18837 जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील 17961 जणांनी उत्तीर्ण होण्यात यश मिळवले आहे. नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात चमक दाखवली असून मंडळाचे अध्यक्ष भागिरथ शेटये यांनी पत्रकार परिषदेतून या निकालाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की मंडळातर्फे 1 मार्च ते 21 मार्च 2025 या कालावधीत एकूण 17 दिवसात ही परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 32 केंद्रातून परीक्षा झाली आणि 8 केंद्रातून उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली.
एकूण 2046 शिक्षकांनी हे तपासणीचे काम केले तर 532 पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्रातील काम पाहिले. या परीक्षेला 9280 मुलगे बसले होते, त्यातील 8814 जण पास झाले. ती टक्केवारी 94.98 एवढी आहे. 9557 मुलींनी परीक्षा दिली. त्यातील 9147 मुली उत्तीर्ण होऊन त्यांची टक्केवारी 95.71 एवढी नेंद झाली. दोघांची सरासरी मिळून एकूण 95.35 टक्के निकाल लागला. राज्यातील सुमारे 407 माध्यमिक शाळांतील मुले या दहावीच्या परीक्षेस बसली होती. त्यात 318 अनुदानित, 78 सरकारी तर 11 विनाअनुदानित शाळांचा समावेश असल्याचे शेटये यांनी स्पष्ट केले. वर्ष 2020-92.69 टक्के, 2021-99.72 टक्के, 2022-92.75 टक्के, 2023-96.64 टक्के तर 2024-92.38 टक्के असा निकाल लागल्याचे ते म्हणाले.
आयटीआयचे विद्यार्थी नापास
काही विषय घेऊन (रिपीटर) 359 मुले परीक्षेला बसली होती. त्यातील 172 जण उत्तीर्ण झाले. ती टक्केवारी 47.91 आहे. आयटीआयमधून 12 जणांनी परीक्षा दिली, पण कोणीच पास झाले नाहीत. सर्व विषय घेऊन 19 जण रिपीटर म्हणून परीक्षेला बसले होते. त्यातील 10 जणांना यश मिळाले. सर्व विषय घेऊन 575 खासगी मुले परीक्षेला बसली त्यातील 131 मुले पास झाली, ती टक्केवारी 22.78 अशी नोंदवण्यात आली आहे.
दिव्यांगांचेहही चांगले यश
दिव्यांग मुलांनी या दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. एकूण 477 दिव्यांग मुलांनी परीक्षा दिली. त्यातील 450 जण उत्तीर्ण होऊन ती टक्केवारी 94.34 एवढी झाली आहे. या परीक्षेत 2335 मुलांनी 75 ते 100 टक्केवारी या गटात यश मिळवले तर 8921 जणांनी 60 ते 75 या टक्केवारीच्या गटात गुण प्राप्त केले. शिवाय 5425 जणांनी 46 ते 59 या टक्केवारीत निकाल दिला. पास झालेल्या प्रत्येकाने एकूण 600 गुणांपैकी सरासरी 394 गुण साध्य केले आहेत.
क्रीडागुणांमुळे 214 विद्यार्थी उत्तीर्ण
दहावीच्या परीक्षेत 6826 जणांना क्रीडा गुणांचा लाभ झाला. परंतु फक्त 214 जणांनाच पास होण्याचे भाग्य लाभले. इतरांना त्या गुणांचा उत्तीर्ण होण्यासाठी फायदा झाला नाही. एक किंवा दोन विषयात नापास झालेल्यांना एटीकेटीची संधी मिळाली असून त्यांना पुरवणी परीक्षा देता येईल किंवा अकरावीत प्रवेश घेऊन नापास झालेले दोन किंवा एका विषयात पास होणे बंधनकारक आहे. ते विषय सोडले नाहीत तर अकरावीत निकाल राखून ठेवला जाणार असल्याचे ते म्हणाले.
दहावीची पुरवणी परीक्षा 5 मे पासून
पुढील वर्षी म्हणजे 2026 मधील दहावी परीक्षेची अंदाजे तारीख 2 मार्च अशी घोषीत करण्यात आली आहे. यावर्षीची पुरवणी परीक्षा 5 मे 2025 पासून होणार असल्याचे सांगण्यात आले. उत्तरपत्रिकांचे फेरतपासणी, पुनर्मूल्यांकन तसेच गुणांची फेरतपासणी यासाठी मुलांनी शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज करावेत. बोर्डाच्या कार्यालयात त्याबाबत विचारणा करू नये, असे शेटये यांनी स्पष्ट केले वरील कामासाठी अनुक्रमे प्रति विषय रु. 350, रु. 700 व रु. 100 असे शुल्क घेण्यात येणार असून त्यासाठी 11 एप्रिलपासून पोर्टल खुले करण्यात येणार आहे. त्यासाठी 15 एप्रिल 2025 अशी मुदत देण्यात आली आहे.
बारावीची पुरवणी परीक्षा 21 एप्रिलपासून
बारावीची पुरवणी परीक्षा 21 एप्रिल ते 2 मे 2025 या कालावधीत होणार आहे. बारावी परीक्षेत नापास झालेल्यांसाठी किंवा निकालात, टक्केवारीत सुधारणा व्हावी म्हणून सदर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा 3 मे रोजी होणर आहे. म्हापसा व मडगाव अशा दोन केंद्रावर ती परीक्षा घेतली जाणार आहे. म्हापशातील परीक्षा आसगाव येथील डिएमसी उच्च माध्यमिक विद्यालयात तर मडगांवात मल्टिपर्पज उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्र आहे. पोर्टलमार्फत परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल असून उशिरा फीसह 17 एप्रिलपर्यंत शुल्क भरता येईल. कला, विज्ञान, वाणिज्य तिन्ही शाखांची परीक्षा वरील कालावधीत होणार असून सकाळी 9.30 वा. परीक्षा सुरू होणार आहे.