जिल्ह्यात 949 पाण्याचे स्रोत दूषित
अथणी तालुक्यात सर्वाधिक : प्रभावित भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा
बेळगाव : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी 1 टक्क्मयांहून अधिक नमुने दूषित आढळल्यानंतर प्रभावित भागांमध्ये टँकरद्वारे पर्यायी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व 15 तालुक्मयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम राबविली. यामध्ये 1,369 गावांतील 6,614 जलस्रोत व साठवण संरचनांमधून एकूण 78,392 पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 949 नमुने दूषित आढळले असून हे प्रमाण सुमारे 1.2 टक्के आहे.
कूपनलिकेचे पाणी सर्वाधिक प्रभावित झाले आहे. भूजलाचा अति उपसा आणि त्यावर वाढते अवलंबित्व ही प्रदूषणाची मुख्य कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे असुरक्षित पाण्याचा वापर टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यासाठी प्रभावित गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढविण्याची गरज आहे. बहुग्राम पाणीपुरवठा योजनांचा वापर करून सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. शुद्धीकरण प्रकल्पांद्वारे पाणी प्रक्रिया करून पुरवठा करणे अत्यावश्यक आहे.
याशिवाय ग्रामपंचायती, आरोग्य विभाग, ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग यांच्या समन्वयाने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी दूषित स्रोतांमधील पाणी पिणे टाळावे. अथणी तालुक्मयात सर्वाधिक 308 दूषित पाणीस्रोत आढळले आहेत. त्या खालोखाल बैलहोंगल आणि रायबाग तालुक्मयांमध्ये प्रत्येकी 115 दूषित स्रोत आढळले आहेत. या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम केली जात आहे. बाधित भागांमध्ये सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यात येत आहे.