For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ पात्र घरेलू कामगारांना मिळणार संसारोपयोगी भांडी संच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ पात्र घरेलू कामगारांना मिळणार संसारोपयोगी भांडी संच
Advertisement

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र घरेलू कामगारांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत व पात्र असलेल्या ९१६ घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार मंत्री आकाश फुंडकर व राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्याजवळ केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या नंतर शासन स्तरावरून हे मोठे यश मिळाले आहे. घरेलू कामगार हिताच्या या महत्वपूर्ण निर्णयानंतर येत्या काही दिवसात पात्र घरेलू कामगारांना भांडी संचांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे कोकण विभाग संघटन मंत्री श्री भगवान साटम व जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.

Advertisement

महाराष्ट्रभरात २०२४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीपूर्वी व नंतरही पात्र घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संचांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांमध्ये हे वाटप अपूर्ण राहिले होते. भारतीय मजदूर संघाने हा अन्यायकारक प्रकार गांभीर्याने घेत कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत भांडी संच तातडीने मंजूर करण्याची आग्रही मागणी केली होती.​मंत्री महोदय यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शासनाने तात्काळ कार्यवाही सुरू करत सिंधुदुर्गातील पात्र ९१६ कामगारांना संसार उपयोगी भांडी संच मंजूर केले आहेत.

हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी व घरेलू कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर, पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय सचिव श्री. अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री श्री. किरण मिलगीर, आणि प्रदेश सचिव श्री. हरी चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहकार्याबद्दल भारतीय मजदूर संघ व घरेलू कामगार संघाच्या वतीने दोन्ही मंत्री यांची भेट घेऊन त्यांचे अधिकृत आभार व्यक्त करण्यात येणार असल्याचे श्री. भगवान साटम व श्री. हेमंत कुमार परब यांनी सांगितले.

Advertisement

​दिनांक ३१ जुलै २०२४ पूर्वी ज्या घरेलू कामगारांची अधिकृत नोंदणी झालेली आहे आणि ज्यांची नोंदणी सध्या जीवित आहे, अशाच घरेलु कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या घरेलु कामगारांची नोंदणी मुदत संपली असेल, त्यांनी आपल्या नोंदणीचे तातडीने नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव श्री. हेमंत कुमार परब यांनी केले आहे. ज्या कामगारांनी घरेलू कामगार कल्याण मंडळासोबतच 'बांधकाम कामगार मंडळा'तही नोंदणी केली असेल, अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे श्री. परब यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.