डीएलएफला बुकिंगमधून 9050 कोटी प्राप्त
तिसऱ्या तिमाहीतील कामगिरी : प्रकल्पांना ग्राहकांचा प्रतिसाद
वृत्तसंस्था/ बेंगळूर
बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी डीएलएफने तिसऱ्या तिमाहीत 9050 कोटी रुपये घरांच्या बुकिंगच्या माध्यमातून प्राप्त केले आहेत. एक वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेमध्ये घर बुकिंगचे प्रमाण चारपट वाढले आहे. म्हणजेच कंपनीच्या प्रकल्पांना ग्राहकांचा चांगला उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद लाभत असल्याचे सिद्ध होत आहे.
आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये 13,300 कोटी रुपये बुकिंगच्या माध्यमातून कंपनीकडे जमा झाले आहेत. वर्षाच्या आधारावर पाहता बुकिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. गुरुग्राम आणि पंचकूला या भागात राबवलेल्या प्रकल्पांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
70 हजार कोटी गुंतवणुकीची तयारी
बांधकाम क्षेत्रातील कंपनीने प्रकल्प विस्ताराची योजना आखली असून तसे भविष्यकालीन नियोजनही करुन ठेवले आहे. पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनी 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून विविध प्रकल्प विकसित करणार आहे. कंपनीने सदरच्या तिमाहीत 660 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत पाहता 26 टक्के अधिक आहे.