For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवात महामार्गावर 900 पोलीस

12:53 PM Aug 23, 2025 IST | Radhika Patil
गणेशोत्सवात महामार्गावर 900 पोलीस
Advertisement

खेड / राजू चव्हाण :

Advertisement

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला असून पोलीस यंत्रणा आतापासूनच सतर्क झाली आहे. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी गणेशोत्सव कालावधीत महामार्गावरील पळस्पे फाट्यापासून सिंधुदुर्गपर्यंत 900 पोलीस कर्मचारी 24 तास तैनात राहणार आहेत. महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी चाकरमान्यांसाठी सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.

यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. नियोजनासाठी गणेशभक्त गावी डेरेदाखल होत आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांची रेलचेल सुरू झाली आहे.

Advertisement

महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे यंदाही चाकरमान्यांना अडथळ्यांची शर्यत पार करत गाव गाठावे लागणार आहे. खड्ड्यांमुळे चाकरमान्यांच्या मार्गात वाहतूक कोंडीचा ‘स्पीडब्रेकर’ कायम असल्याने यंदाही गणेशभक्तांना विलंबाच्या प्रवासाला सामोरे जावे लागणार आहे.

महामार्गाच्या अशा बिकट परिस्थितीत जीवघेणा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना काही अंशी दिलासा देण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे सरसावली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी 900 पोलीस कर्मचाऱ्यांद्वारे वाहनांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही पॅमेऱ्याची करडी नजर राहणार असून अशा वाहनांना वॉकीटॉकीधारी पोलिसांकडून संदेश गेल्यास केवळ 3 कि.मी. अंतरावर अडवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

महामार्गावर ठिकठिकाणी चालक व वाहकांचे समूपदेशन केले जाणार आहे. महामार्गावर विशेष पोलीस कक्षासह उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात चाकरमान्यांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अपघातप्रवण क्षेत्रातही विशेष लक्ष देणार असून जनजागृतीसाठी फलक उभारण्यात आले आहेत. महामार्गावर पोलीस दुचाकीस्वारांच्या पथकांचीही गस्त राहणार आहे. यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 23 ऑगस्टपासून महामार्गावरून धावणारे टेलर्स व इतर मोठ्या वाहनांवरही बंदी घालण्यात आल्याने चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

  • वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा

महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दुर्घटना घडल्यास तातडीने मदतकार्य करण्याच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे पालन न करता बेदकारपणे वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.