90 पॅलेस्टिनी कैद्यांची इस्रायलकडून सुटका
वृत्तसंस्था/ तेल अवीव/रामल्लाह
इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध रविवार, 19 जानेवारी रोजी थांबले आहे. युद्धबंदीच्या पहिल्या दिवशी इस्रायलने 90 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले आहे. यापूर्वी हमासने तीन इस्रायली महिला ओलिसांनाही सोडले होते. रोमी गोनेन, एमिली दमारी आणि डोरॉन स्टाइनब्रेचर अशी या ओलिसांची नावे आहेत. रेड क्रॉसच्या मदतीने तिन्ही ओलिसांना इस्रायलमध्ये परत आणण्यात आले. त्यांच्या सुटकेनंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये लोकांनी आनंद साजरा केला.
अपहरणकर्त्यांच्या परतीबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘संपूर्ण देश तुम्हाला आलिंगन देत आहे’ असे नेतान्याहू म्हणाले. युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायलच्या कडक नाकेबंदीमध्ये मानवतावादी मदत घेऊन जाणारे 600 हून अधिक ट्रक गाझामध्ये पोहोचले. पॅलेस्टिनी नागरिक युद्धग्रस्त भागातून त्यांच्या घरांची तपासणी करण्यासाठी परतत आहेत.
इस्रायल सुमारे 700 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार
युद्धबंदी करार 3 टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात, हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या 33 बंधकांना सोडणार आहे. तसेच, इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर अंतरावर परतेल. इस्रायलच्या न्याय मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात सोडण्यात येणाऱ्या 95 पॅलेस्टिनी कैद्यांची यादीही जारी केली आहे. यामध्ये 69 महिला, 16 पुरुष आणि 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इस्रायल 700 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. त्यांच्या नावांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील अनेक लोक हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्यात हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे सदस्य समाविष्ट आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलमध्ये घुसून 1200 लोकांना ठार मारले आणि 251 जणांना ओलीस ठेवले. त्यानंतर इस्रायली सैन्याने गाझावर हल्ला केला होता.