वगळली 90 लाख अवैध नावे पश्चिम बंगालमध्ये
‘अंतिम’ मतदारसूची प्रसिद्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालची अंतिम मतदारसूची केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. एकंदर 90 लाखांहून अधिक अवैध मतदारांची नावे, या सूचीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे आता वैध मतदारांची संख्या साधारणत: 6 कोटी 70 लाख इतकी राहिली आहे. वगळलेल्या मतदारांना लवादाकडे अपील करण्याचा अधिकार आहे. तथापि, आता या सूचीत नव्या मतदारांची नावे समाविष्ट केली जाणार नाहीत, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. परिणामी, ही सूची जवळपास अंतिम मानण्यात येत आहे. आयोगाने जिल्हावार सूचीही प्रसिद्ध केली.
एकंदरीत, 90 लाख 83 हजार 345 नावे वगळली गेली आहेत. त्यांच्यापैकी जवळपास 58 लाख नावे एसआयआरच्या प्रथम टप्प्यातच वगळली गेली होती. त्यानंतर आणखी 5 लाख नावे वगळण्यात आली. 60 लाख 6 हजार 675 नावे संशयित मानण्यात आलेली होती. त्यांची छाननी करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने कलकत्ता उच्च न्यायालयाकडे सोपविले होते. कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साधारणत: 800 विद्यमान आणि निवृत्त न्यायाधीशांनी नियुक्ती केली. त्यांनी या साठ लाख नावांचे परीक्षण करुन त्यांच्यातील 27 लाख 16 हजार 393 नावे वगळण्याचा आदेश दिला आहे. अशा प्रकारे एकंदर 90 लाखांहून अधिक नावे वगळण्यात आली.
काही नावे अद्यापही उरलेली
न्यायाधीशांकडे सोपविलेली जवळपास सर्व प्रकरणे संपलेली आहेत. मात्र, अद्यापही 22 हजार 163 नावांचे परीक्षण व्हायचे आहे. ते झाल्यानंतर मतदारसूचीला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षणाची (एसआयआर) ही प्रक्रिया अत्यंत दक्षतापूर्वक आणि पारदर्शी पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. प्रत्येक संशयित नावाचे स्वतंत्ररित्या परीक्षण करण्यात आलेले आहे.
मुर्शिदाबाद जिल्ह्यात सर्वाधिक
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सर्वाधिक अवैध मतदारांची नावे वगळण्यालत आली असून ती संख्या जवळपास 4 लाख 55 हजार आहे. मालदा जिल्ह्यात 2.39 लाख, दक्षिण 24 परगाणा जिल्ह्यात 2.22 लाख, तर नादिया जिल्ह्यात 2.08 लाख नावे वगळण्यात आली आहेत. दक्षिण बंगालमध्ये सर्वाधिक अवैध मतदार आढळले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून दिली गेली.
महत्वाचे जिल्हे आणि वगळलेले मतदार
जिल्हा वगळलेले मतदार
मुर्शिदाबाद 4 लाख 55 हजार
मालदा 2 लाख 39 हजार
दक्षिण 24 परगाणा 2 लाख 22 हजार
नादिया 2 लाख 8 हजार
उत्तर दिनाजपूर 1 लाख 76 हजार
हुगळी 1 लाख 20 हजार
बीरभूम 82 हजार
पश्चिम वर्धमान 74 हजार
वगळलेल्या मतदारांची ही संख्या आधी वगळलेल्या मतदारांच्या व्यतिरिक्त आहे.