प्रतिद्वंद्वी करांना 90 दिवस स्थगिती
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय, चीनचा मात्र अपवाद, अमेरिकेसह अनेक देशांचे शेअरबाजार तेजीत
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर लावण्यात आलेल्या प्रतिद्वंद्वी करांना 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. मात्र, चीनवरील 125 टक्के कर तसाच ठेवला आहे. ज्या देशांनी अमेरिकेशी करविषयक करार करण्यासंबंधी चर्चा चालविलेली आहे, त्या देशांना हा दिलासा देण्यात आला आहे, असे ट्रम्प यांनी या निर्णयाची घोषणा करताना स्पष्ट केले. या स्थगितीमुळे भारतालाही मोठा दिलासा मिळाला आहे. हा नव्वद दिवसांचा कालावधी संपण्याच्या आत भारत आणि अमेरिका यांच्यात एक प्राथमिक व्यापार करार केला जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल 2025 या दिवशी या प्रतिद्वंद्वी करांची (रेसिप्रोकल टॅरिफ) घोषणा केली होती. 9 एप्रिलपासून हे कर लागू करण्यात आले होते. ट्रम्प यांनी भारतावर सवलतीचा 27 टक्के कर लावला होता. तसेच चीनवर 54 टक्के कर लावण्यात आला होता. इतर 70 हून अधिक देशांवर अशा प्रकारे विविध प्रमाणांमध्ये कर लागू करण्यात आले होते.
जगभरात खळबळ
ट्रम्प यांच्या करांमुळे जगभरात मोठीच खळबळ उडाली. बहुतेक सर्व देशांचे शेअरबाजार प्रचंड प्रमाणात घसरले. अमेरिकेच्याही शेअरबाजारांची जवळपास 10 टक्के घसरण झाली होती. अमेरिकेच्या जगातील सर्वात मोठ्या रोखे बाजारालाही मोठा फटका बसला होता. त्यामुळे अनेक देशांनी अमेरिकेशी करांच्या संदर्भात चर्चा चालविली होती. ही चर्चा पूर्ण करण्यासाठी कालावधी लागणार असल्याने प्रतिद्वंद्वी करांवर 90 दिवसांची स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले गेले आहे.
भारताची भूमिका
भारतावरही अमेरिकेने 27 टक्के कर लागू केला होता. तथापि, भारताने अमेरिकेला घाईघाईने प्रत्युत्तर देण्याचे किंवा अमेरिकेविरोधात आक्रमक भाषा करण्याचे टाळले होते. उलट, ट्रम्प सत्तेवर आल्यापासूनच भारत आणि अमेरिका यांच्यात एक व्यापक आणि सर्वंकष व्यापार करार करण्यासाठी चर्चेला प्रारंभ करण्यात आला होता. या चर्चेसाठी भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल दोन आठवडे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. आजही ही व्यापार करार चर्चा केली जात आहे. येत्या 90 दिवसांच्या आत व्यापार कराराचा प्रथम टप्पा पूर्ण करण्याची भारताची इच्छा आहे. अमेरिकेचाही अशा व्यवस्थेला प्रतिसाद मिळत आहे. भारताच्या पावलावर पाऊल ठेवून युरोपियन महासंघ आणि इतर अनेक देशांनीही अमेरिकेची चर्चा सुरु केली आहे. परिणामी ट्रम्प यांनी हा दिलासा दिला आहे.
चीन एकाकी...
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मात्र या प्रकरणात एकाकी पाडल्याचे दिसत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात एकमेकांवर कर लावण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी चीनवर 125 टक्के कर लावला आहे. तर चीननेही अमेरिकेवर 84 टक्के कर लागू केला आहे. प्रतिद्वंद्वी करांवरच्या स्थगितीतून अमेरिकेने चीनला वगळले आहे. त्यामुळे चीनवर सध्यातरी हे कराचे ओझे राहणार असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात पुढचा आठवडा महत्वाचा ठरणार आहे.
दोघांचेही एकमेकांना आवाहन
चीनने अमेरिकेला उलट उत्तरे देऊ नयेत. चीनला चर्चा करण्याची इच्छा असेल, तर अमेरिका सज्ज आहे. चीनने अमेरिकेचा मान ठेवला तर त्या देशाचा लाभ होईल, असे प्रतिपादन अमेरिकेने केले. तर अमेरिका काही पावले पुढे येण्यास राजी असेल तर आम्हीही तसे करु. अमेरिकेनेही आमचा मान राखला पाहिजे, असे आवाहन चीनने केले. त्यामुळे पुढे काय घडणार यासंबंधी औत्सुक्य आहे.
युरोपियन महासंघाची नरमाई
अमेरिकेकडून करस्थगितीची घोषणा झाल्यानंतर युरोपियन महासंघानेही अमेरिकेवर लावलेल्या अतिरिक्त करांना 90 दिवसांची स्थगिती दिली. महासंघातील अनेक देश सध्या अमेरिकेची व्यापार आणि करांसंबंधी चर्चा करीत आहेत. या चर्चेसाठी हा 90 दिवसांचा कालावधी दोन्ही बाजूंना उपयोगी पडणार आहे.
जागतिक शेअरबाजार तेजीत
अमेरिकेच्या करस्थगितीच्या घोषणेची त्वरित प्रतिक्रिया जगातील विविध शेअरबाजारांमध्ये पहावयास मिळाली आहे. प्रत्यक्ष अमेरिकेच्या शेअरबाजारांमध्ये 4 टक्के तेजी आली आहे. तसेच जपान, दक्षिण कोरिया, भारत, फ्रान्स, जर्मनी, चीन आणि ब्रिटन तसेच ऑस्ट्रेलियातील शेअरबाजारांमध्ये तेजीचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेतील शेअरबाजारांनी तेजीचा विक्रम नोंदविल्याचे वृत्त आहे.
जगभरात समाधानाची भावना....
- करस्थगितीमुळे जगभरात समाधानाची भावना, निर्यातदारांना दिलासा
- भारतात औषध निर्यातदारांकडून समाधान व्यक्त, करारासंबंधी चर्चा
- चीन एकाकी पडल्याचे वातावरण, नजिकचा काळ महत्वाचा ठरणार