शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटींचा निधी द्या
आमदार जयश्री जाधव यांची मागणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले : उर्वरीत रस्त्यांची स्थिती मांडली
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे.
आमदार जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील रस्त्यासाठी यापूर्वी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग झाला आहे. यामध्ये शहरातील प्रमुख 16 रस्ते, गटर चॅनेल, फुटपाथ आदींचा समावेश आहे. मात्र, या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. शंभर कोटीच्या निधीत समावेश नसलेल्या अनेक रस्त्यांची ही दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यांचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. कोल्हापूर शहरातील अशा 88 रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 90 कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी तत्काळ महापालिकेला द्यावा, असे आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.