बारावीचा 90.64 टक्के निकाल
17686 पैकी 16030 विद्यार्थी उत्तीर्ण : मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांची पत्रकार परिषदेत माहिती
पणजी : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) बारावी परीक्षेचा (एचएससी) निकाल जाहीर केला असून त्यात 90.64 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 17686 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती, त्यात 8462 मुले आणि 9224 मुलींचा समावेश होता. त्यापैकी 16030 विद्यार्थी परीक्षेत पास झाले असून 7505 मुले तर 8525 मुलींनी यश मिळवले आहे. त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी अनुक्रमे 88.69 व 92.42 एवढी नोंदवण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी काल गुरुवारी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारावीच्या निकालाची तपशिलवार माहिती दिली.
कला शाखेतून एकूण 4068 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 3703 जण पास झाले. वाणिज्य शाखेतून 5085 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 4745 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्ण टक्केवारी अनुक्रमे 91.03 व 93.31 एवढी आहे. विज्ञान शाखेतून सर्वाधिक म्हणजे 6086 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील 5558 विद्यार्थ्यांना यश मिळाले. व्यावसायिक शाखेतून 2447 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 2024 जणांना यश लाभले. वरील दोन्ही शाखांची उत्तीर्ण टक्केवारी अनुक्रमे 91.32 व 82.71 अशी नोंद झाल्याचे शेटये म्हणाले.
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आली. राज्यातील एकूण 20 केंद्रातून ती परीक्षा झाली. सर्वसाधारण गटातील 13573 विद्यार्थ्यांपैकी 12264 उमेदवार पास झाले. त्यातील 1309 जणांना सुधारणा व प्रगती करण्याची गरज आहे. ओबीसी गटातून 2443 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 2236 जण उत्तीर्ण झाले. त्यापैकी 207 जणांना प्रगती करण्याची आवश्यकता दिसून येते. एससी गटातील 264 विद्यार्थ्यांपैकी 237 जण पास झाले. त्यातील 29 जणांना प्रगती करण्याची गरज दिसून येते. एसटी गटातील 1406 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यातील 1293 जणांना यश मिळाले. त्या गटातून 113 जणांना प्रगतीची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष बोर्डाने काढला आहे.
खासगी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी 26 टक्के
या परीक्षेला 138 खासगी विद्यार्थी बसले होते. त्यातील 37 जण उत्तीर्ण झाले. ती टक्केवारी 26.81 आहे. आयटीआय नोंदणी केलेल्या 47 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 37 जण पास झाले. त्याची टक्केवारी 78.72 एवढी नोंद झाली. रिपिटर म्हणून काही विषय घेऊन बसलेल्या 869 विद्यार्थ्यांपैकी 468 जणांना यश मिळाले. ती टक्केवारी 53.86 एवढी असल्याचे शेटये यांनी सांगितले.
उत्तरपत्रिकांची पडताळणी, पुनर्मूल्यांकन
उत्तरपत्रिकांची फोटोकॉफी तपासणीसाठी प्रति विषय रु. 350 शुल्क घेण्यात येणार असून त्यासाठी 5 एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर प्रति विषय रु. 700 शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी 12 एप्रिलपर्यंतची मुदत आहे. गुणांची फेरतपासणी करायची असेल तर प्रति विषयासाठी रु. 100 आकारण्यात येणार आहेत. त्यासाठी 12 एप्रिलची मुदत देण्यात आली आहे. हे सर्व शाळेतूनच ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवरच करण्याचे बंधन असून बोर्डाच्या कार्यालयात त्याबाबत दखल घेण्यात येणार नसल्याचे शेटये यांनी स्पष्ट केले.
क्रीडा गुणांचा 3066 विद्यार्थ्यांना लाभ
एकूण 3066 विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ झाला आणि त्यातून 126 जण पास झाल्याची माहिती शेटये यांनी दिली. बारावी परीक्षेतील टक्केवारी वाढवण्यासाठी बोर्डातर्फे पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून त्याची अंदाजे तारीख 21 एप्रिल किंवा त्यानंतर अशी आहे. काही विषयात नापास झालेल्या उमेदवारांना देखील पुरवणी परीक्षेला बसण्याची आणि नापास विषय सोडवण्याची संधी आहे, असे त्यांनी नमूद पेले.
बारावीची 2026 सालची परीक्षा 10 फेब्रुवारीला
मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी पुढील वर्षाची म्हणजे 2026 मधील बारावी परीक्षेची तारीख 10 फेब्रुवारी अशी जाहीर केली असून ती देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करता येईल, असे स्पष्टीकरण दिले.
दहावीचा निकालही लवकरच
दहावी परीक्षेतील उत्तरपत्रिकांची 90 टक्के तपासणी पूर्ण झाली असून त्या परीक्षेचा निकाल 15 एप्रिलपर्यंत किंवा तत्पूर्वी जाहीर होण्याचे संकेत शेटये यांनी दिले. दहावी, बारावी अशा दोन्ही परीक्षांसाठी उत्तरपत्रिकांची तपासणी केंद्रे वाढवण्यात आल्यामुळे निकाल लवकर देणे शक्य झाले असून दहावीचा निकालही लवकर लागणार असल्याची शक्यता शेटये यांनी वर्तवली आहे. पत्रकार परिषदेला बोर्डाचे सचिव विद्यादत्त नाईक व उपसचिव भारत चोपडे उपस्थित होते.