घातक रसायनाने पिकवलेली 9 टन केळी म्हापशात जप्त
अलिफुल्ला करगुटलीच्या दुकानात सापडली : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची कारवाई : मोहीम सुरूच राहणार
म्हापसा : बनावट किंवा दुय्यम दर्जाच्या खाद्य पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केलेली मोहीम मंगळवारीही सुरूच होती. म्हापशातील सबयार्डातील केळी विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत रसायनाचा वापर करून पिकवलेली सुमारे नऊ टन केळी जप्त करण्यात आली. या केळ्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या ताब्यात देण्यात आली. म्हापसा येथील सबयार्डमध्ये असलेल्या अलिफुल्ला करगुटली यांच्या दुकानावर हा छापा अन्न व औषधे प्रशासनाने टाकला. या केळ्यांवर रासायनिक फवारणी केली होती. अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली. म्हापसा सबयार्डमध्ये दर दिवशी असे प्रकार आम्हाला पहायला मिळतात. अशाने आमच्या जीवितास धोका होऊ शकतो, अशी माहिती यावेळी एकनाथ म्हापसेकर यांनी दिली. येथील केळी विक्रेते गलिच्छ ठिकाणी केळी विक्रीस ठेवतात. असे छापे पुन्हा पुन्हा मारल्यास त्यांच्यावर आळा बसेल, असे व्यापारी चंद्रकांत हरमलकर यांनी सांगितले.