ब्राझीलमध्ये मिळाला 9 हजार वर्षे जुना खजिना
43 मानवी सांगाडेही हस्तगत
ब्राझीलमध्ये पुरातत्व तज्ञांनी 9 हजार वर्षे जुन्या एका खजिन्याचा शोध लावला आहे. या खजिन्याची किंमत अब्जावधी डॉलर्स असल्याचे मानले जात आहे. पुरातत्वतज्ञांनी खजिन्याच्या ठिकाणावरून 43 मानवी सांगाडेही हस्तगत केले आहेत. याला ब्राझीलच्या इतिहासातील मोठ्या पुरातत्व शोधांपैकी एक मानले जातेय.
साओ लुइसमध्ये फियाल्होच्या चकारा रोसेन पुरातत्व स्थळावर उत्खननादरम्यान सुमारे 43 मानवी सांगाडे आणि 1 लाखाहून अधिक कलाकृतींचा शोध लागला आहे. या कलाकृती बहुमूल्य असून त्यांची किंमत हजारो कोटींमध्ये असल्याची माहिती ब्राझीलच्या इन्स्टीट्यूट फॉर नॅशनल हिस्टोरिक अँड आर्टिस्टिक हेरिटेजने दिली आहे.
हा खजिना टीय शहर साओ लुइसमध्ये एका नव्या अपार्टमेंट परिसराच्या निर्मितीदरम्यान मिळाला आहे. प्रथम कामगारांना मानवी हाडं आणि मातीच्या भांड्यांचे तुकडे मिळाले होते. यानंतर पुरातत्व तज्ञांनी तेथे उत्खनन केले आहे. यावेळी शोध लागलेल्या कलाकृती सुमारे 9 हजार वर्षांपूर्वींच्या होत्या. 1970 च्या दशकात या ठिकाणी ओलावो लीमा नावाच्या एका संशोधकाकडून संशोधन करण्यात आले होते, परंतु हे स्थळ किती विस्तृत आहे याची जाणीव आतापर्यंत झाली नव्हती.
उत्खननात काय मिळाले?
ब्राजीलची निर्मिती कंपनी एमआरवीने स्थळावर अध्ययन करण्यासाठी 2019 मध्ये डब्ल्यू लेज आर्कियोलॉजी कंपनीकडे काम सोपविले होते. खोदकाम सुरू केल्यावर स्थळावर अन्य अवशेषही शोधण्यात आले होते. यात मानवी जबड्याच्या हाडाचा हिस्सा सामील होता, असे प्रमुख पुरातत्व तज्ञ वेलिंग्टन लेज यांनी सांगितले. लेज आणि त्यांच्या टीममध्ये 27 लोक सामील आहेत. या ठिकाणावरून दगडी अवजारं, चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे आणि सजावटीच्या वस्तू शोधल्यावर 43 सांगाडे आणि 1 लाखाहून अधिक कलाकृतींचाही शोध लावण्यात आला आहे.