एअर इंडियाकडून 9 हजार जणांना नोकरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एअर इंडिया एअरलाईनने आपल्या व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी गेल्या दोन वर्षांमध्ये 9000 जणांना नोकरी देऊ केली आहे. यामध्ये पाच हजार व्रु मेंबर्स म्हणून कार्यरत झाले असल्याची माहिती एअर इंडिया एअरलाईनचे प्रमुख कॅम्पबेल विल्सन यांनी दिली आहे. विविध मार्गांवर नव्याने विमानसेवा सुरू करण्यासोबतच सेवेमध्ये सुधारणा करण्याचे काम कंपनीकडून सुरू आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 24 टक्के इतकी हिस्सेदारी असणाऱ्या कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 27 टक्क्यांपर्यंत बाजारातली हिस्सेदारी प्राप्त केली आहे. याचसोबत आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या बाबतीत पाहता हिस्सेदारी 21 टक्क्यांहून 24 टक्क्यांवर पोहोचली आहे.
भरतीत वाढ
कंपनीने पाच वर्षाची महत्त्वाकांक्षी विहान ही योजना लागू केलेली असून तिला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये 5000 नव्या क्रू मेंबर्सना कंपनीने सामील केले असून एकंदर 9000 कर्मचाऱ्यांना कंपनीत सामावून घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
35 नव्या मार्गांवर सेवा सुरु
कंपनीने 67 नॅरो बॉडी विमानांच्या केबिनसह बैठकीसाठीच्या सीट संदर्भातल्या सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याला तीन ते चार विमानांचे नूतनीकरण करण्याचे कार्यही कंपनीकडून हाती घेतले जात आहे. सध्याला एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये 142 विमाने असून 35 नव्या मार्गांवर अलीकडेच विमानसेवा देखील कंपनीने सुरू केल्याचे विल्सन यांनी सांगितले.