वीज कोसळल्याने राज्यात 9 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, अंगावर वीज पडल्याने राज्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. बळ्ळारी, हावेरी, गदग, विजापूर, चिक्कमंगळूर, कोप्पळ या जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या आहेत.
बळ्ळारी जिल्ह्यातील सिरगुप्पा तालुक्यातील रारवी येथे अंगावर वीज पडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. बिरप्पा, (वय 45), सुनील (वय 26), विनोद (वय 14) अशी मृतांची नावे आहेत. शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी गेल्यानंतर जोरदार वारा सुटल्याने ते झाडाखाली थांबले होते. यावेळी वीज कोसळल्याने ते गतप्राण ^झाले. शिरगुप्पा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
हावेरी जिल्ह्याच्या हिरेकेरुर तालुक्यातील डम्मळ्ळी येथे नागप्पा कणसोगी (वय 65) आणि रट्टीहळ्ळी तालुक्यातील सुनील काळेर (वय 29) तसेच गदग जिल्ह्याच्या बस्सापूर येथील मरियव्वा नायकर (वय 60) यांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्याच्या तंगडगी येथे वीज कोसळून मल्लप्पा ताळीकोटे (वय 47) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मल्लप्पा शेतात काम करत होता. दुपारच्या सुमारास वीज पडल्याने त्याचा मृत्यू ^झाला. कोप्पळ जिल्ह्याच्या कनकगिरी तालुक्यातील हुलिहैदर येथे शेतात काम करत असताना यंकप्पा जाडी (वय 45) याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन बैलही मृत झाले. कनकगिरी पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.
चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या कडूर तालुक्यातील गेद्देहळ्ळी येथे मेंढपाळाचा मृत्यू झाला. गेद्लेहळ्ळी येथील लोकेशप्पा (वय 65) शेतात मेंढ्या चारण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अज्जमपूर पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.