For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानची 9 युद्ध विमाने नष्ट

07:00 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानची 9 युद्ध विमाने नष्ट
Advertisement

‘सिंदूर’चा दणका : अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे, युएव्ही आणि रडार यंत्रणा उध्वस्त, गुप्त अहवालात माहिती

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली 

‘सिंदूर’ अभियानात भारताने पाकिस्तानची अतोनात हानी केली असून या हानीसंबंधात नवनवी माहिती आता बाहेर पडत आहे. पाकिस्तानच्या वायुदलाची किमान सहा युद्ध विमाने, दोन अत्याधुनिक विमाने, अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि किमान 10 विनाचालक वायु वाहने (युएव्ही) पाकिस्तानला गमवावी लागली आहेत. पाकिस्तानच्याच गुप्त अहवालात ही माहिती देण्यात आली असून या अहवालातील महत्वाचा भाग उघड झाल्याने ही माहिती जगासमोर आली आहे. त्यासमवेतच पाकिस्ताच्या दहशतवादी संघटनांचे 9 तळ आणि 19 वायुतळ तसेच लष्करी तळ भारताने नष्ट केले आहेत. यासंबंधीची माहितीही मंगळवारी याच अहवालातून उघड झाली होती. भारतीय क्षेपणास्त्रांच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानची युद्ध विमाने नष्ट झाली आहेत. भारतीय वायुदलापाशीही ही तांत्रिक माहिती संकलित झाली आहे. सिंदूर अभियानात भारतीय वायुदलाने पाकिस्तानला दिलेल्या या दणक्यामुळे त्या देशाचे वायुदल विकलांग झाले असल्याचे दिसून येते.

Advertisement

अत्याधुनिक विमानेही नष्ट 

भारताने पाकिस्तानची किमान दोन अत्याधुनिक विमाने नष्ट केल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे. ही विमाने इलेक्ट्रॉनिक काऊंटरमेजर एअरक्राफ्ट या प्रकारची आणि एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टिम प्रकारची होती. ही विमाने नष्ट झाल्याचे उपग्रहीय चित्रणावरुन स्पष्ट होत आहे. ही विमाने भारताच्या ‘सुदर्शन’ यंत्रणेने 300 किलोमीटर अंतरावरुन अचूक प्रहार करुन नष्ट केली आहेत. तर भोलारी वायुतळावर आकाशातून केलेल्या अचूक माऱ्यामुळे या तळावरील स्विडीश बनावटीचे एवॅक्स विमान जागीच नष्ट झाले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

आणखी मोठ्या हानीची शक्यता

भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या आकाशात नष्ट केलेल्या विमानांचा हिशेब अहवालात देण्यात आला आहे. तथापि, वायुतळांवरील जी विमाने जागीच नष्ट झाली, त्याची माहिती अद्याप स्पष्ट व्हायची आहे. पाकिस्तानने अद्याप या नष्ट झालेल्या वायुतळांची स्वच्छता करण्यासही प्रारंभ केलेला नाही. तेथील ढिगारे उपसण्यात आलेले नाहीत. त्यामुळे किती विमाने बसल्या जागीच उध्वस्त झाली, याचा कोणताही आढावा अद्याप घेण्यात आलेला नाही, असे दिसून येत आहे.

चीनी ड्रोन्स मोठ्या संख्येने नष्ट 

भोलारी आणि नूर खान वायुतळांवरील हल्ल्यांमध्ये अनेक चीनी बनावटीची विंग लुंग श्रेणीतील, मिडियम अल्टीट्यूड दीर्घ पल्ल्याची ड्रोन्स भारताच्या वायुहल्ल्यात नष्ट झाली आहेत. हे हल्ले भारताने राफेल आणि सुखोई विमानांच्या साहाय्याने केले होते. याच हल्ल्यांमध्ये पाकिस्तानची 10 हून अधिक विनाचालक वायुवाहने मोडून पडली आहेत, अशी स्पष्टोक्ती अहवालात करण्यात आली आहे.

आधुनिक चीनी क्षेपणास्त्रे निकामी 

पाकिस्तानने भारतावर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्या देशाने चीनी बनावटीची आधुनिक क्षेपणास्त्रे उपयोगात आाणली होती. तथापि, ती भारताच्या भूमीवर आदळण्यापूर्वीच आकाशात त्यांचा खात्मा करण्यात आला. अशा नष्ट झालेल्या क्षेपणास्त्रांची नेमकी संख्या अहवालात नसती, तरी ही संख्या खूपच मोठी असावी, असा एकंदर सूर आहे. पाकिस्तानच्या हानीची गणना अद्यापही भारतीय वायुदलाकडून केली जात आहे. या गणनेसाठी उपग्रहीय छायाचित्रे आणि गुप्तचरांनी पुरविलेल्या माहितीचा आधार घेतला जात आहे. पाकिस्तानच्या लष्कराने तयार केलेल्या गुप्त अहवालाचा जो भाग उघड झाला आहे, त्यावरुन भारताने आधी दिलेली माहिती खरी ठरली आहे. एकंदरीत पाहता पाकिस्तानला हा अपेक्षेपेक्षाही जबरदस्त दणका असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

एकंदर हानी अपेक्षेपेक्षा अधिक 

  • ‘सिंदूर’ अभियानात पाकिस्तानची हानी अनुमानापेक्षाही कितीतरी अधिक
  • पाकिस्तानच्याच गुप्त अहवालानुसार त्याच्या वायुदलाला हा जबरदस्त धक्का
  • ‘सिंदूर’ अभियानामुळे पाकिस्तानचे वायूदल गेले किमान 10 वर्षांनी मागे
Advertisement
Tags :

.