छत्तीसगडमध्ये 9 मंत्र्यांनी घेतली शपथ
विष्णुदेव साय यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार करण्यात आला. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी दुपारी राजभवनात नऊ नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. साय यांनी आपल्या मंत्रिमंडळात पाच नवीन चेहरे आणि मागील रमणसिंग मंत्रिमंडळातील चार माजी मंत्र्यांना समाविष्ट करून घेतले आहे.
कोरबाचे आमदार लखनलाल दिवांगन, मनेंद्रगडचे आमदार श्याम बिहारी जैस्वाल, रायगडचे आमदार ओ. पी. चौधरी, भातगावच्या आमदार लक्ष्मी राजवाडे आणि बालोदाबाजारचे आमदार टंकाराम वर्मा या पाच नवोदितांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. माजी मंत्र्यांमध्ये रायपूर-दक्षिणचे आमदार बृजमोहन अग्रवाल यांना सर्वसाधारण गटातून, रामानुजगंजचे आमदार रामविचार नेताम यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आणि नारायणपूरचे आमदार केदार कश्यप आणि नवगढचे आमदार दयालदास बघेल यांना अनुसूचित जातीतून मंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री विष्णुदेव यांच्यासह उपमुख्यमंत्री अऊण साओ आणि विजय शर्मा यांनी शपथ घेतली होती. सध्या मंत्रिमंडळातील एकूण संख्या 12 इतकी झाली आहे.