डिसेंबरपर्यंत 9 खाणी होणार सुरू
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त
पणजी : राज्यात 12 खाणींचा ई-लिलाव पूर्ण झाला असून यापैकी 9 खाणी येत्या डिसेंबरअखेर कार्यान्वित होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मागील अधिवेशनात केलेल्या अभिभाषणावर मुख्यमंत्री बोलत होते. हा आभार प्रस्ताव आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सोमवारी सभागृहात मांडला होता. या ठरावावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह विरोधी आमदारांनी आक्षेप नोंदवत तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सरकार करत असलेल्या आणि राज्यपालांनी मांडलेल्या मतांबाबत अनुकूल मत व्यक्त करीत राज्य सरकारचे कौतुक केले. त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी आपले सविस्तर भाष्य केले.
गोवा अनेक क्षेत्रात अग्रेसर
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात सांगितले की, राज्य सरकारच्यावतीने राज्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताबरोबर स्वयंपूर्ण गोवा आणि विकसित गोवा 2037 यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गोवा लहान राज्य असले तरी आणि 14 वर्षे उशिरा मुक्त होऊनही गोवा देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत अनेक क्षेत्रात खूप पुढे आहे.
टीबीला हद्दपार करण्याचे ध्येय
आरोग्य क्षेत्रावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, टीबी ऊग्णांसाठी योग्य उपचार व्हावेत, यासाठी ग्रामीण आरोग्य केंद्रातही तशी सोय केली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील टीबी रोग हद्दपार करणे हे सरकारचे ध्येय आहे. याशिवाय टाटा मेमोरियल कॅन्सर इस्पितळाकडे सरकारने भागीदारी केलेली आहे. ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ या अंतर्गत स्तन आणि सर्वाईकल कॅन्सरवरही त्वरित उपचार मिळावेत, यासाठी सरकार गंभीर आहे. गावागावात उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रयत्नातून मोबाईल व्हॅन सेवाही उपलब्ध केली आहे, अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
ईएमआर हेल्थ सर्व्हिसेसचे कौतुक
ईएमआर हेल्थ सर्व्हिसेस यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. कारण 7 लाख 88 हजार 95 गंभीर रुग्णांवर उपचार करताना 5 हजार जणांचे जीव वाचविण्यात ईएमआर हेल्थ सर्व्हिसेसने मोठी कामगिरी केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नारी शक्तीसाठी विशेष काम
नारी शक्तीसाठी सरकार विशेष काम करीत आहे. ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत चांगले काम सुरू आहे. 343 कोटी ऊपये 10 वर्षांत महिलांना कर्ज स्वऊपात या खात्याने दिले आहेत. 20 लाख ऊपयांचे कर्ज देण्याची तयारी या खात्याने ठेवली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पेडण्याची स्नेहा नाईक आदर्शवत युवती
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू केली. या योजनेचा फायदा अनेकांना झाला असून, अनेकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय उभारले आहेत. स्नेहा नाईक ही पेडण्याची युवती लखपती योजनांचा लाभ घेऊन त्यांनी कुणबी शाल, कुणबी टोपी, कुणबी साडी बनवून एक वेगळाच आदर्श घालून दिला. आज या युवतीने तीन देशात त्याची विक्री केलेली आहे. महिन्याला 1 लाख ऊपयांचा फायदा मिळवणारी स्नेहा नाईक ही लखपती योजनेसाठी आदर्शवत ठरली आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगून स्नेहा नाईक हिचे सभागृहात कौतुक केले.