यादगिरीजवळ अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा होरपळून मृत्यू
धडक बसल्यानंतर कार-खासगी बसला भीषण आग : मृत सिरवार तालुक्यातील
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात कार आणि खासगी बस यांची समोरासमोर धडक झालेल्या भीषण अपघातात सिरवार नगरपंचायतीच्या नगरसेवकासह त्यांच्या कुटुंबातील 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुरपूर तालुक्यातील देवापूर येथे शुक्रवारी ही घटना घडली. अपघातानंतर दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मृत सिरवार येथील रहिवासी होते.
अपघातात नगरसेवक कृष्णा नायक (वय 56), त्यांची पत्नी अनंतकला (वय 45), मुलगी निसर्गा (वय 28), जावई शरणप्पा (वय 36), नातू सिद्धार्थ (वय 3), नात अद्विका (वय 5), श्रीनिधी (वय दीड वर्षे), कृष्णा यांच्या भावाची मुलगी शशिकला (वय 30), तिचा मुलगा चंदन (वय 3) यांचा मृत्यू झाला.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, शुक्रवारी अमावस्या असल्याने सिरवार येथून कारने कलबुर्गी जिल्ह्यातील तिंथणी येथील मौनेश्वर मंदिराला जात होते. दरम्यान, देवापूरजळ बेंगळूरहून कलबुर्गीकडे जाणाऱ्या खासगी बसची कारला समोरून धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. परिणामी कारमधील जणांचा होरपळून मृत्यू झाला. दोघांना कारमधून बाहेर काढून इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शशिकला आणि चंदन यांचाही मृत्यू झाला.
सर्व मृतदेह सुरपूर तालुका इस्पितळात हलविण्यात आले. घटनास्थळी सुरपूर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. खासगी बसमधून 33 जण प्रवास करत होते. बसला आग लागल्यानंतर ते तातडीने बाहेर पडले. मात्र, कारमधील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोघांना बाहेर काढण्यात आले. परंतु, त्यांचा इस्पितळात मृत्यू झाला.