शेअरबाजारात आठवड्यात 9 आयपीओ होणार लाँच
विविध कंपन्यांकडून 4300 कोटी रुपयांची होणार उभारणी : क्लीन मॅक्स 3100 कोटी उभारणार
वृत्तसंस्था/ मुंबई
येत्या आठवड्यामध्ये जवळपास 9 आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत. या आयपीओच्या माध्यमातून 4 हजार 300 कोटी रुपये उभारण्याची योजना विविध कंपन्यांनी आखली आहे. यामध्ये एकाचवेळी 4 आयपीओ मुख्य बोर्डावरती सादर होणार असून 5 एसएमईवर सादर केले जाणार आहेत.
क्लीन मॅक्स एन्व्हायरोचा 3100 कोटीचा आयपीओ
क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स यांचा आयपीओ 23फेब्रुवारी रोजी खुला झाला असून 25 फेब्रुवारीपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. 3100 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार असून यामध्ये 1200 कोटी रुपयांचे ताजे समभाग आणि 1900 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जाणार आहेत. आयपीओची इशू किंमत 1000 ते 1053 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. सदरच्या कंपनीचे समभाग 2 मार्च रोजी एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध होऊ शकतात. क्लीन मॅक्स ही देशातील सर्वात मोठी व्यवसायिक आणि औद्योगिक नूतनीकरणयोग्य ऊर्जा कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने 1610 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न प्राप्त केले होते.
पीएनजीएस रेवाचा येणार आयपीओ
यासोबतच दागिन्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी यांचा आयपीओ 24 फेब्रुवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 26 फेब्रुवारी रोजी बंद होणार आहे. 380 कोटी रुपयांची उभारणी या आयपीओअंतर्गत केली जाणार असून 367 ते 386 रुपये प्रति समभाग अशी इशू किंमत निश्चित करण्यात आली आहे. सदरचा कंपनीचा समभाग 4 मार्च रोजी शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध होऊ शकतो. रेवा ब्रँड अंतर्गत कंपनी सोने आणि प्लॅटिनम यांच्या साथीने हिरे व मूल्यवान खड्यांच्या माध्यमातून दागिने तयार करुन विक्री करते. सप्टेंबर 2025पर्यंत पाहता कंपनीची 24 स्टोअर्स महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये असून कर्नाटकामध्ये 25 शहरांमध्ये स्टोअर्स कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 259 कोटी रुपये होते तर 59 कोटींचा निव्वळ नफा प्राप्त केला होता.
ओमनी टेकचा आयपीओ 25 ला होणार खुला
अभियांत्रिकी क्षेत्रातील ओमनी टेक इंजिनिअरिंग यांचा आयपीओ 25 फेब्रुवारी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 27 फेब्रुवारी रोजी बंद होणार आहे. 216 ते 227 रुपये प्रति समभाग अशी इशू किंमत निश्चित करण्यात आली आहे. 583 कोटी रुपये या आयपीओतून उभारण्यात येणार असून 418 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जातील.
इतर कंपन्यांचेही आयपीओ
सोबत एसएमई प्लॅटफॉर्मवर देखील विविध कंपन्यांचे आयपीओ सादर होणार आहेत. यात किआसा रिटेल यांचा 69 कोटींचा तर एकॉर्ड ट्रान्सफॉर्मर अँड स्विच गिअर यांचा 25 कोटी रुपयांचा आयपीओ सादर होणार आहे. मोबिलाइज अॅप लॅब यांचा 20 कोटी रुपयांचा आयपीओ असणार असून स्ट्राईडर्स इम्पेक्स यांचाही आयपीओ 36 कोटी रुपयांचा सादर होणार आहे.