8वी पास नोमान सोशल मीडिया ‘एक्सपर्ट’
आयएसआय हस्तकाने पाकिस्तानला विकली देशाची गोपनीय माहिती
कधी सर्वसामान्य युवकांप्रमाणे दिसणारा 28 वर्षीय नोमान इलाही आता सुरक्षा यंत्रणांच्या निशाण्यावर आहे. कैरानाच्या बाजार बेगमपुरा येथील रहिवासी नौमानला पानिपत पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी करताना पकडले हेते. त्याच्या विरोधात देशद्रोह आणि गोपनीय माहिती शत्रूला पुरविण्यासंबंधी गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो मागील दोन वर्षांपासून संवेदनशील माहिती आयएसआयला पाठवित होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्याला श्रीनगर येथे जाण्याचे काम आयएसआयने सोपविले होते, परंतु तो यात यशस्वी होऊ शकला नाही आणि देशाच्या गुप्तचर यंत्रणांच्या जाळ्यात अडकला.
पासपोर्ट अन् दस्तऐवज जप्त
सुरक्षा यंत्रणांनी शुक्रवारी सकाळी 6 वाजता पानिपत येथून कैराना येथे नोमान येथे आणले, स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत त्याच्या घराचे टाळे उघडविण्यात आले आणि झडती घेण्यात आली. यादरम्यान वेगवेगळ्या लोकांचे पासपोर्ट, संशयास्पद दस्तऐवज आणि डिजिटल पुरावे हस्तगत करण्यात आले.
श्रीनगर येथे पाठविण्याची होती तयारी
नोमानला पाकिस्तानातून श्रीनगर येथे जाण्याचे निर्देश मिळत होते. त्याच्या मोबाइलच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये हा प्लॅन उघड झाला. श्रीनगरमध्ये सैन्याची तैनात, हालचालींविषयी माहिती प्राप्त करण्याचा निर्देश आयएसआयने त्याला दिला होता, याकरता त्याला मोठ्या रकमेचे आमिष दाखविण्यात आले होते.
व्हिडिओ कॉल्सचे पुरावे
प्रत्येक माहितीच्या बदल्यात चांगली रक्कम मिळेल, तुला मालामाल करू असा संदेश त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आढळून आला. नोमानच्या चौकशीदरम्यान मोबाइलमध्ये व्हिडिओ कॉल्स आणि पाकिस्तानी क्रमांकांशी संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील मिळाले आहेत. नोमान मागील दोन वर्षांपासून पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती पाठवित होता. तो फोनवरील चॅट्स डिलिट करत होता, परंतु पाकिस्तानी हस्तकाशी झालेला चॅट, कॉल रिकॉर्डिंग, व्हिडिओ कॉल्सचे स्क्रीनशॉट आणि मीडिया फाइल्स सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाल्या आहेत.
केवळ आठवीपर्यंत शिक्षण
नोमान केवळ 8 वीपर्यंत शिकलेला आहे, परंतु तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर करण्यात तो तरबेज आहे. सुरक्षारक्षकाच्या नोकरीच्या आड तो माहिती मिळवत पाकिस्तानला पाठवत राहिला. कामावर असतानाच तो सोशल मीडिया हँडलिंग आणि तंत्रज्ञानाचा वापर करत पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो पूर्ण प्रशिक्षण मिळवत हेरगिरी करत होता, केवळ पैसा कमाविणे हाच त्याचा उद्देश ठरला होता असे पोलिसांचे सांगणे आहे.
नातेवाईकांनी तोडले संबंध, बहिणीला धक्का
नोमान इलाही पानिपतमध्ये स्वत:ची बहिण जीनतच्या घरी राहून सुरक्षा रक्षकाच्या नोकरीच्या आड गुप्त माहिती जमविला राहिला. नोमानची बहिण जीनत आणि तिचा पती इरफानने नोमानसोबतचे संबंध तोडले आहेत. जो देशाचा विश्वासघात करेल, त्याच्याशी आमचे काहीच देणेघेणे नाही असे इरफान यांनी म्हटले आहे. तर जीनत यांना धक्का बसला आहे. नोमानने पूर्ण देशात आमची बेइज्जती केली, नोमान अनेक दिवस घरातून गायब राहायचा, घरी असताना तो मोबाइलमध्येच डोकावून बसायचा असे जीनत यांनी सागितले.
अनेक यंत्रणांकडून चौकशी
नोमान संबंधी आता पानिपत पोलीस, आयबी आणि मिलिट्री इंटेलिजेन्सकडून त्याचे डिजिटल नेटवर्क, संपर्क सूत्र आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.