हैदराबादमध्ये 8 वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
अल्पवयीनासमवेत 2 जणांना अटक
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादच्या नरसिंगीमध्ये सोमवारपासून बेपत्ता 16 वर्षीय मुलगी चेंगिचेरला येथील एका फ्लॅटमध्ये आढळून आली असून तेथे तिच्यावर दोन अल्पवयीनांसमेत तीन जणांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी आता या मुलीची फ्लॅटमधून सुटका केली आहे. याप्रकरणी 24 वर्षीय आरोपी इमरानला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाइल होममध्ये पाठविण्यात आले आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
पीडित मुलगी इयत्ता 8 ची विद्यार्थिनी आहे. चारमिनार येथे एका फुटवेअर शॉपमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला ती पूर्वीपासून ओळखत होती. त्याच्यासोबत ती मोबाइलवरून संपर्कात होती. 16 फेब्रुवारी रोजी ती शाळेनंतर त्याला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर आणखी दोन आरोपी त्याच्यासोबत आले आणि त्यांनी मुलीला एका रिकाम्या फ्लॅटमध्ये नेले होते. तेथे तिघांनीही तिला मारहाण करत बलात्कार केला आहे. वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी झाली आहे.