सहाव्या टप्प्यात 889 उमेदवार स्पर्धेत
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान 25 मे या दिवशी होत आहे. या टप्प्यात 7 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 58 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षांसह मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार स्पर्धेत असून उमेदवारांची एकंदर संख्या 889 आहे. या टप्प्यात एकंदर 889 उमेदवार स्पर्धेत असून त्यांच्यात अपक्षांची संख्या अर्थातच सर्वाधिक आहे. अनेक महत्वाच्या उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय या टप्प्यात होणार आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीच्या सातही मतदारसंघांमध्ये याच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान होणारे मतदारसंघ, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा तसेच महत्वाच्या द्वंद्वांचा हा आढावा...
या टप्प्याची व्याप्ती...
? सहाव्या टप्प्यात 7 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांच्यातील 58 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. एकंदर 889 उमेदवारांचे भवितव्य या टप्प्यात मतदान यंत्रांमध्ये बद्ध होणार आहे. सर्वाधिक जागांवर भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार स्पर्धेत ठेवले आहेत. त्याखालोखाल काँग्रेस आहे.
? या टप्प्यात लोकसभा निवडणूक वायव्य भारतात सरकणार आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये मतदान घेतले जाईल. जम्मू-काश्मीर या केंद्र शासित प्रदेशाच्या अनंतनाग-राजौरी मतदारसंघात 7 मे या दिवशी मतदान होणार होते. तथापि, निवडणूक आयोगाने ते 25 मे पर्यंत पुढे ढकलले होते.
? पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी असणाऱ्या चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशाच्या एका मतदारसंघातही मतदान होणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांमध्ये मतदान होईल. हरियाणा आणि दिल्ली येथील सर्व मतदारसंघांमध्ये या एकाच टप्प्यात मतदान होईल.
राज्यनिहाय मतदारसंघ...
- बिहार
वाल्मिकी नगर (भारतीय जनता पक्ष), पश्चिम चंपारण्य (भारतीय जनता पक्ष), पूर्व चंपारण्य (भारतीय जनता पक्ष), शिओहर (संयुक्त जनता दल), वैशाली (भारतीय जनता पक्ष), गोपालगंज (भारतीय जनता पक्ष), सिवान (संयुक्त जनता दल), महाराजगंज (भारतीय जनता पक्ष)
- दिल्ली
चांदनी चौक (भारतीय जनता पक्ष), ईशान्य दिल्ली (भारतीय जनता पक्ष), नवी दिल्ली (भारतीय जनता पक्ष), वायव्य दिल्ली (भारतीय जनता पक्ष), दक्षिण दिल्ली (भारतीय जनता पक्ष), पूर्व दिल्ली (भारतीय जनता पक्ष)
- हरियाणा
अंबाला (भारतीय जनता पक्ष), कुरुक्षेत्र (भारतीय जनता पक्ष), सिरसा (भारतीय जनता पक्ष), कर्नाळ (भारतीय जनता पक्ष), हिस्सार (भारतीय जनता पक्ष), सोनीपत (भारतीय जनता पक्ष), रोहटक (भारतीय जनता पक्ष), भिवानी-महेंद्रगढ (भारतीय जनता पक्ष), गुरगाव (भारतीय जनता पक्ष), फरीदाबाद (भारतीय जनता पक्ष)
- ओडीशा
भुवनेश्वर (बिजू जनता दल), पुरी (बिजू जनता दल), ढेंकानाल (भारतीय जनता पक्ष), केओंझार (बिजू जनता दल), कटक (भारतीय जनता पक्ष), संभलपूर (भारतीय जनता पक्ष)
- उत्तर प्रदेश
सुलतानपूर (भारतीय जनता पक्ष), प्रतापगढ (काँग्रेस), फुलपूर (भारतीय जनता पक्ष), अलाहाबाद (भारतीय जनता पक्ष), आंबेडकरनगर (भारतीय जनता पक्ष), श्रावस्ती (भारतीय जनता पक्ष), डुमरियागंज (भारतीय जनता पक्ष), बस्ती (भारतीय जनता पक्ष), संत कबीर नगर (भारतीय जनता पक्ष), लालगंज (भारतीय जनता पक्ष), अझमगढ (समाजवादी पक्ष), जौनपूर (भारतीय जनता पक्ष), मछलीशहर (भारतीय जनता पक्ष), भदोही (भारतीय जनता पक्ष)
- पश्चिम बंगाल
तामलुक (तृणमूल काँग्रेस), कंठी (भारतीय जनता पक्ष), घाटल (तृणमूल काँग्रेस), झरग्राम (भारतीय जनता पक्ष), मेदीनीपूर (तृणमूल काँग्रेस), पुरुलिया (भारतीय जनता पक्ष), बांकुरा (भारतीय जनता पक्ष), बिष्णुपूर (तृणमूल काँग्रेस)
- झारखंड
गिरीध (भारतीय जनता पक्ष), धनबाद (भारतीय जनता पक्ष), रांची (भारतीय जनता पक्ष), जमशेदपूर (भारतीय जनता पक्ष)
टप्पा कोणासाठी महत्वाचा...
? हा टप्पा तसे बघितल्यास सर्व पक्ष आणि त्यांच्या आघाड्या यांच्यासाठी महत्वाचाच आहे. कारण कदाचित याच टप्प्यात कोणाला बहुमत मिळणार याचा निर्णय यंत्रबद्ध होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची आघाडी या दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी त्यांच्या विजयाचे दावे यापूर्वीच केलेले आहेत.
? 2019 च्या निवडणुकीत या टप्प्यातील 58 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 35 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 42 जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यामुळे या पक्षासमोर आपला प्रभाव टिकविण्याचे आव्हान आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर यश मिळाले होते. ऊर्वरित जागा इतर पक्षांना होत्या.
? या टप्प्यासमवेत लोकसभेच्या 543 मतदारसंघांपैकी 486 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर सातव्या आणि अंतिम टप्प्यात 1 जूनला मतदान होणार असून ते 56 मतदारसंघांमध्ये होईल. त्यानंतर आतुरतेने सर्वांनाच प्रतीक्षा मतगणनेची असेल, जी 4 जूनला अर्थात पुढच्या मंगळवारी होईल.