88 भारतीयांचा बचाव, 287 अद्याप बेपत्ता
चीनमधून 120 भारतीय नेपाळमध्ये दाखल ; नेपाळमधील महापुराबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून अपडेट्स जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या महापूर-जलप्रलय आपत्तीमुळे झालेल्या विध्वंसानंतर भारताने शेजारील देशाला मदतीचा हात पुढे केला आहे. याचदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळमधील पुरामुळे अडकलेल्या आणि सुटका झालेल्या लोकांबद्दलची नवीनतम माहिती देखील प्रसिद्ध केली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत 120 भारतीय नागरिक चीनमधून नेपाळमध्ये दाखल झाले. तसेच, नेपाळमध्ये अडकलेल्या एकूण 88 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 287 जण अद्याप बेपत्ता आहेत. याव्यतिरिक्त भारतीय वंशाचे 128 लोक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
शनिवारी नेपाळच्या रसुवा जिह्यातील एका जलविद्युत प्रकल्पातून चार भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी नेपाळमधील भारतीय नागरिक आणि बचाव व मदत कार्याबद्दल माहिती दिली. सुटका झालेले चारही भारतीय नागरिक लवकरच काठमांडूला पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायंकाळी 5 वाजेपर्यंतची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सुटका झालेल्या भारतीय नागरिकांची नावे रिपू कुमार, चनेश्वर नरझरी, कृपा शंकर आणि मोहम्मद मिन्हाजुद्दीन अशी आहेत. भारताने नेपाळमधील परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आपली पथके सज्ज ठेवली असून आता हळूहळू नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री भारतीय पर्यटकांचा एक गट विशेष विमानाने नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाला होता. या पर्यटकांचे स्वागत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी केले.
बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी नेपाळी लष्कराची मोहीम सुरू आहे. त्यांच्या दिमतीला आता भारतीय पथकही दाखल होणार आहे. आता बोगद्यांमध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी एक विशेष बोगदा बचाव पथक लवकरच काठमांडूमध्ये दाखल होईल. नेपाळमध्ये रसुवा येथील त्रिशुली-3 ‘अ’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मोठी बचाव मोहीम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून नेपाळी सुरक्षा दल बोगद्याच्या प्रवेशद्वारावरील ढिगारा हटवून बोगद्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळी सैन्य, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांचे एकूण 82 जवान या मोहिमेत सातत्याने कार्यरत आहेत. भारताने या मोहिमेसाठी तांत्रिक मदतही वाढवली आहे.`चबरोबर पुरात मरण पावलेल्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुन्यांची तपासणी करण्याकरिता न्यायवैद्यक तज्ञांची पथके नेपाळला पाठवण्यात आली आहेत.
तिबेटमध्ये अडकलेले 400 भारतीय सुरक्षित
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, तिबेट प्रदेशात अडकलेल्या सुमारे 400 भारतीयांशी संपर्क साधण्यात आला असून ते त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. शुक्रवार संध्याकाळपर्यंत यापैकी 153 भारतीय रस्त्याने सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले होते. त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे. त्याचवेळी, नेपाळमधून 85 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. नेपाळमध्ये 320 भारतीयांशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही. याव्यतिरिक्त, कैलास मानसरोवर यात्रेकरूंसह सुमारे 100 भारतीय वंशाचे लोक बेपत्ता आहेत, ज्यांच्याकडे इतर देशांचे नागरिकत्व आहे.