एका श्वासात, पाण्यात 86 दंड
कमल कलोई नामक एका भारतीय योगशिक्षकाने एका श्वासात, पाण्यात बुडलेल्या स्थितीत 86 दंड काढण्याचा विश्वविक्रम केला आहे. हा विक्रम या योगशिक्षकाने व्हिएतनाम या देशात केला असून, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आता या योगशिक्षकाचे नाव ‘गिनीज’ विक्रमपुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्याने हा विश्वविक्रम एका जलतरण तलावाच्या तळाशी जाऊन केला आहे.
योगव्यायामाच्या माध्यमातून श्वास नियंत्रण करण्याची क्षमता या शिक्षकाने प्राप्त करुन घेतली आहे. योगव्यायामामुळे श्वास नियंत्रण उत्तम प्रकारे करता येते हा अनुभव अनेक योगाभ्यासकांना आलेला असतो. विशेषत: प्राणायाम शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्याने श्वास बराच काळ रोधून धरण्याची क्षमता निर्माण होते, असे प्रतिपादन केले जाते. काही जणांचा यावर विश्वास बसत नाही. तथापि, या योगशिक्षकाने हे प्रतिपादन स्वत: केलेल्या प्रात्यक्षिकातून खरे असल्याचे सिद्ध केले.
आपण सहा मिनिटांपर्यंत श्वास रोधून धरु शकतो, या कमल कलोई यांचे प्रतिपादन आहे. या क्षमतेमुळेच मी पाण्याच्या खाली एका श्वासात 86 दंड काढू शकलो. हा प्रयोग त्यांनी प्रत्यक्ष गिनीज विक्रमपुस्तिकेच्या प्रतिनिधिंच्या समोर सिद्ध केल्याने आता यासंबंधी कोणाच्याही मनात कोणतीही शंका उरण्याचे काहीही कारण नाही. त्यांच्या नावावर हा एकच विक्रम आहे, असे मुळीच नाही. त्यांनी 2022 मध्ये, अर्थात, चारच वर्षांपूर्वी पाण्याच्या खाली एका श्वासात सलग 21 योगासने करण्याचा विक्रमही नेंदविला आहे. या विक्रमाची नोंदही ‘गिनीज’ विक्र
म पुस्तिकेत करण्यात आली आहे. प्रथम विक्रम होईपर्यंत त्यांना आपल्या क्षमतेसंबंधी शाश्वती वाटत नव्हती. तथापि, आता दोन अत्यंत अवघड विक्रम त्यांनी साध्य केले असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता त्यांनी यापेक्षा अधिक कठीण आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्जता चालविली आहे. मात्र, ते आणखी कोणते विक्रम करणार आहेत, याची माहिती अद्याप उघड केलेली नाही. असे आणखी विक्रम झाल्यानंतर ते सर्वांपर्यंत पोहचतीलच, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या दोन योगविक्रमानंतर त्यांचे नाव जगात गाजत आहे. ते मूळचे भारतीयच असल्याने भारतासाठीही त्यांचे हे विक्रम अत्यंत अभिमानास्पद आहेत.