Konkan Agriculture University डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला पायाभूत सुविधांसाठी ८६ कोटी मंजूर
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यापीठाच्या विविध प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देत सुमारे ८६ कोटी रुपयांच्या विकासकामांचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक वसतिगृह सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या प्रयत्नाने व कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या पाठपुराव्याला हे यश आल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठ प्रशासनाने वाढती विद्यार्थी संख्या, अपुरी निवास व्यवस्था आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कृषी परिषदेमार्फत अनेक बांधकामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. कृषी परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
चार महाविद्यालयांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची उभारणी शासनाने कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, वानराई (वनशास्त्र) महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी १०० प्रवेश क्षमतेच्या नवीन वसतिगृह इमारती उभारण्यास मंजुरी दिली आहे. प्रत्येक वसतिगृहासाठी सुमारे १४.४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या अनेक विद्यार्थिनींना मर्यादित वसतिगृह सुविधेमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही विद्यार्थिनींना खाजगी निवासस्थानी राहावे लागत असल्याने आर्थिक भार वाढत होता. नवीन वसतिगृहांमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.
उद्यानविद्या महाविद्यालयाला स्वतंत्र प्रशासकीय इमारत
उद्यानविद्या महाविद्यालयासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी २.४८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सध्या स्वतंत्र प्रशासकीय इमारतीचा अभाव असल्याने कार्यालयीन कामकाजावर मर्यादा येत होत्या. नवीन इमारतीमुळे शैक्षणिक, प्रशासकीय आणि संशोधनविषयक कामकाज अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
प्रशिक्षणार्थी शेतकरी आणि पाहुण्यांसाठी अतिथीगृह
विद्यापीठामध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी कार्यशाळा, संशोधन उपक्रम आणि शेतकरी प्रशिक्षणासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी व तज्ज्ञ येत असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र निवासव्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी १४.४१ कोटी रुपये खर्चाच्या नवीन अतिथीगृह इमारतीलाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी शेतकरी, संशोधक, तज्ज्ञ आणि विद्यापीठात येणाऱ्या मान्यवरांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कोकणातील कृषी शिक्षणाला नवी दिशा
कोकणातील कृषी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात राज्यभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. वाढत्या प्रवेशसंख्येमुळे पायाभूत सुविधांवर ताण निर्माण झाला होता. शासनाच्या या निर्णयामुळे केवळ इमारती उभारल्या जाणार नाहीत, तर विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे.
विकासकामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना
या सर्व बांधकामांसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याने स्थानिक बांधकाम व्यवसाय, रोजगार आणि पूरक उद्योगांनाही चालना मिळणार आहे. दापोली परिसरात विकासकामांचा वेग वाढण्यास मदत होणार असून, विद्यापीठाचा शैक्षणिक व संशोधनात्मक दर्जा आणखी उंचावण्यास हातभार लागणार आहे.
शासनाच्या या निर्णयाचे विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच कोकणातील कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांकडून स्वागत करण्यात येत आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रस्तावांना अखेर मंजुरी मिळाल्याने दापोली कृषी विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.