Ambenali Ghat Murder | नात्याला काळिमा! सोन्याच्या हव्यासासाठी आजीचा खून; मृतदेह आंबेनळी घाटातील दरीत फेकला
प्रतापगड : नात्यागोत्यांनाही काळिमा फासणारी आणि मानवतेला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी ८५ वर्षीय वृद्ध आजीचे अपहरण करून तिचा निर्घृण खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे रायगड आणि सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आंबेनळी घाट पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील सुनंदा लक्ष्मण पाटील (वय ८५) या ३१ मे रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मनुष्य बेपत्ता क्रमांक ०८/२०२६ दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शोधमोहीम सुरू केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
तपासादरम्यान अगदर्श हिराजी शेडगे (वय ३८) व रितेश नरेश लोहार (वय २०, दोघेही रा. तिनवीरा, ता. अलिबाग) यांनी संगनमत करून वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यासाठी कट रचल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी सुनंदा पाटील यांचे अपहरण करून त्यांचा खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुर्गम व खोल दरी असलेल्या आंबेनळी घाटाची निवड केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
पोलिस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अलिबाग पोलिसांचे पथक पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात दाखल झाले. बावली टोक ते दाभिल टोक दरम्यानच्या दरीत मृतदेह फेकण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र घाटातील अतिशय धोकादायक भूभाग, खोल दरी आणि सुरू असलेला पाऊस यामुळे ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरत होती.
प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी जीव धोक्यात घालून दरीत शोधकार्य सुरू केले. जवळपास दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे १०० फूट खोल दरीत काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दोरखंड आणि विशेष साहित्याच्या साहाय्याने सदस्य दरीत उतरले आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता अत्यंत धाडसी पद्धतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.
या प्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र गुरुनाथ चवरकर यांच्या फिर्यादीवरून मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, अपहरण, पुरावा नष्ट करणे आणि कट रचणे या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची दाहकता अजूनही ताजी असतानाच आता खुनाच्या या थरारक घटनेमुळे आंबेनळी घाट पुन्हा एकदा भयावह चर्चेचा विषय बनला आहे.