पक्ष्याचे सोंग घेत 85 किलोमीटर पायपीट
कारण जाणून घेतल्यावर लोकांनी केले कौतुक
कुणाला श्वान पसंत असतात, तर कुणाला मांजर, कुणाला गाय पसंत असते, परंतु एका व्यक्तीला एक विशेष पक्षी इतका अधिक पसंत होता की त्याने त्याचा कॉस्ट्यूम परिधान करत 85 किलोमीटरपर्यंत पायपीट केली आहे. लोकांना रस्त्यावर एक विशाल पक्षी दिसून आला, परंतु या पक्ष्याच्या आत एक इसम होता. त्याने स्वत:च्या अजब कृतीचे कारण सांगितल्यावर लोक दंग झाले आहेत.
46 वर्षीय मॅट ट्रेविलेन हे इंग्लंडमध्ये राहतात, ते एक फार्मिंग इन प्रोटेक्टेड लँडस्केप्स ऑफिसर आहेत. त्यांना यूरेशियन कर्ल्यू नावाचा पक्षी पसंत आहे. परंतु ब्रिटनमधून हा पक्षी आता नामशेष होत चालला आहे. याच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पक्ष्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी मॅट यांनी एक युक्ती केली. त्यांनी अत्यंत मोठा पक्ष्याचा कॉस्ट्यूम तयार करवून घेतला आणि तो परिधान करत ते चालू लागले.
जागरुकतेसाठी ते 85 किलोमीटरपर्यंत पायी चालले. यादरम्यान त्यांनी तो कॉस्ट्यूम परिधान केला होता. कॉस्ट्यूम स्प्लिट बांबू, मस्लिन आणि पॉलिएस्टरने तयार करण्यात आला होता. त्यांनी स्वत:च्या या प्रवासाकरता ईस्टरचा वीकेंड निवडला होता. पहिल्या दिवशी ते 40 किलोमीटर चालले तर दुसऱ्या दिवशी त्यांनी उर्वरित अंतर कापले आहे. त्यांनी स्वत:चा हा प्रवास पॅटिले ब्रिजपासून सुरू केला होता.
85 किलोमीटरचा प्रवास
हा प्रवास अत्यंत आनंददायक होता, हवामान चांगले होते आणि मी 14 तास चाललो आहे. कॉस्ट्यूम अत्यंत हलका होता, यामुळे मी सहजपणे चालू शकतो. कॉस्ट्यूम तयार करण्यास 3 दिवसांचा कालावधी लागला होता. युरेशियन कर्ल्यू पक्षी माझ्या पसंतीचा आहे. या पक्ष्याची संख्या कमी होतेय हे कळल्यावर निराश झालो होतो. 20 वर्षांमध्ये पक्ष्याच्या संख्येत वेगाने घट दिसून आली. आता 58 हजाराच्या आसपास पक्षी शिल्लक राहिले आहेत. हा प्रवास लोकांना जागरुक करेल आणि पक्ष्यांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली जातील अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.