जम्मू-काश्मीरचे 84 टक्के आमदार करोडपती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष 148 कोटींसह सर्वात श्रीमंत
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली, श्रीनगर
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) आमदारांच्या संपत्तीबाबत अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार निवडणुकीत विजयी झालेल्या 90 आमदारांपैकी 84 टक्के म्हणजेच 76 आमदारांनी आपली संपत्ती 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असल्याचे जाहीर केले आहे.
2014 च्या शेवटच्या विधानसभेत 75 टक्के म्हणजेच 65 आमदारांनी आपली संपत्ती 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले होते. मागील विधानसभेच्या तुलनेत या विधानसभेत करोडपती आमदारांची संख्या 9 टक्क्यांनी वाढली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि सेंट्रल शाल्टेंग मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले तारिक हमीद कारा हे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांनी आपली संपत्ती 148 कोटी रुपये असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे. तर डोडामधून निवडणूक जिंकलेले आपचे आमदार मेहराज मलिक यांच्याकडे सर्वात कमी म्हणजेच केवळ 20 हजार रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात दिसून आले आहे.
2 आमदारांची संपत्ती 100 कोटींहून अधिक
जम्मू-काश्मीरच्या 90 पैकी फक्त 2 आमदारांकडे 100 कोटी ऊपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. 148 कोटी रुपयांची संपत्ती असलेले काँग्रेस अध्यक्ष कारा यांच्याशिवाय भाजप आमदार देवेंद्र राणा यांच्याकडे 126 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आमदार आहेत. तसेच 14 आमदारांची संपत्ती 1 कोटींपेक्षा कमी आहे. 27 आमदारांची संपत्ती 1 कोटी ते 5 कोटींच्या दरम्यान आहे. तर 26 आमदार 5 ते 10 कोटींच्या घरात आहेत. 21 आमदारांची एकूण संपत्ती 10 कोटी ते 100 कोटी रुपये आहे.
आमदारांची सरासरी मालमत्ता 11.6 कोटी
‘एडीआर’ अहवालात जम्मू-काश्मीरच्या आमदारांची सरासरी संपत्ती 11.6 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर 2014 च्या निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांची सरासरी मालमत्ता 4.5 कोटी रुपये होती. याचा अर्थ यावेळच्या आमदारांची सरासरी संपत्ती गेल्या वेळच्या तुलनेत दुप्पट आहे.
पक्षनिहाय स्थिती
नॅशनल कॉन्फरन्सचे 42 पैकी 37 आमदार करोडपती आहेत. पक्षाच्या आमदारांची सरासरी संपत्ती 8.47 कोटी रुपये आहे. भाजपच्या 29 पैकी 25 आमदार करोडपती आहेत. भाजप आमदारांची सरासरी संपत्ती 14.55 कोटी रुपये आहे. काँग्रेसचे सर्व 6 आमदार करोडपती असून त्यांची सरासरी संपत्ती 30 कोटी रुपये आहे. पीडीपीच्या 3 आमदारांची सरासरी संपत्ती 4.25 कोटी रुपये आहे. सीपीआय(एम) आणि पीपल्स कॉन्फरन्समधून विजयी झालेले आमदार करोडपती आहेत. 7 अपक्ष आमदारांची सरासरी मालमत्ता 5 कोटी रुपये आहे.