जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासाठी केंद्राकडून 836 कोटी मंजूर
खासदार इरण्णा कडाडी यांचे प्रयत्न
बेळगाव : केंद्रीय शहर विकास खात्याच्यावतीने अमृत 2.0 योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यासाठी 836 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्ह्यातील 32 ठिकाणी या निधीअंतर्गत विकासकामे राबविली जाणार आहेत. या योजनेमुळे नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी माहिती राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी दिली. अमृत योजनेअंतर्गत 50 टक्के निधी पेंद्र सरकार, 40 टक्के निधी राज्य सरकार तर 10 टक्के निधी नागरिकांकडून जमा केला जाणार आहे. मुडलगी, नागनूर, कल्लोळी, अरभावी, घटप्रभा येथील पाणीपुरवठ्यासाठी 165 कोटी रुपये यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहेत. बेळगाव शहरातही अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहे. मच्छे-पिरनवाडी नगरपंचायतीअंतर्गत 85 कोटी रुपये पाणीपुरवठा प्रकल्पासाठी देण्यात आले आहेत.
याचबरोबर हारूगेरी, मुगळखोडसाठी 51 कोटी, कित्तूरसाठी 25 कोटी, एम. के. हुबळी 18 कोटी, हुक्केरी 9 कोटी, चिंचली 23 कोटी, रायबाग 22 कोटी, खानापूर 20 कोटी, ऐनापूर 14 कोटी, एकसंबा 16 कोटी, अथणी 47 कोटी, कंकणवाडी 14 कोटी, कुडची 18 कोटी, संकेश्वर 11 कोटी, मुनवळ्ळी 39 कोटी, अंकलगी 42 कोटी, बोरगाव 19 कोटी, कागवाड-शेडबाळ-उगार खुर्द 66 कोटी, रामदुर्ग 19 कोटी, यरगट्टी 29 कोटी, निपाणीसाठी 32 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. इरण्णा कडाडी यांनी केंद्रीय शहर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर, तसेच कर्नाटकचे नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांचे आभार मानले आहेत.