उत्तर प्रदेश-बिहारमध्ये प्रकोपाचे 83 बळी
जोरदार पावसासोबतच वीज कोसळण्याच्या दुर्घटनांनी हाहाकार : काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात हवामानाचा दुहेरी फटका सुरूच आहे. एकीकडे तीव्र उष्णता असताना दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा कहर सुरू आहे. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये वादळामुळे 83 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यापैकी 61 मृत्यू बिहारमध्ये झाले असून 22 जण उत्तर प्रदेशात दगावले आहेत. गेल्या चार दिवसांपासून उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड या राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा सुरू असून नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. उत्तराखंडमध्ये चमोली येथे भूस्खलनाची दुर्घटना घडली असून काही वाहने व पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आली.
जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, आसाम, मेघालय येथे 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच गडगडाटामुळे वीज कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गडगडाट, लखलखाटानंतर मुसळधार पावसाची शक्यताही आहे.
देशातही तीव्र उष्णता सुरूच आहे. गुरुवारी बहुतेक राज्यांमध्ये दिवसाचे तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले होते. राजस्थानमधील बाडमेर येथे सर्वाधिक 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये पारा 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. राजस्थान-गुजरातमध्ये ते 40-43 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. दिल्लीतही पारा 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.
राजस्थानमधील जैसलमेर-बाडमेर, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची लाट तीव्र होण्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले. मध्यप्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट आहे.