पाकिस्तानातील संघर्षात आतापर्यंत 82 जण ठार
सुन्नी आणि शिया समुदायांमध्ये वाद
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून सुन्नी आणि शिया समुदायांमध्ये भीषण जातीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंच्या गोळीबार, दगडफेक आणि जाळपोळीत आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला असून 156 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 16 जण सुन्नी लोक असून शिया समुदायातील 66 जण समाविष्ट असल्याचे खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिह्यातील एका स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
पाकिस्तान हा सुन्नी बहुसंख्य देश आहे, परंतु अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या कुर्रम जिह्यात शियाबहुल लोक अधिक आहेत. या दोन समुदायांमध्ये अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून या भागात संघर्ष भडकला आहे. याचदरम्यान, शनिवार 23 नोव्हेंबर रोजी सुमारे 300 कुटुंबांना कुर्रम जिह्यातून पलायन करण्यास भाग पाडण्यात आले. या लोकांना हाकलण्यासाठी गोळीबाराचे सत्र सुरूच होते. याच गोळीबारात काही जणांना प्राण गमवावे लागल्याने मृतांचा आकडा 82 पर्यंत वाढला आहे.