4 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 81 हजार कोटीची वाढ
आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक नुकसानीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहापैकी 4 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 81 हजार कोटी रुपयांनी वाढले होते. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मागच्या आठवड्यात मोठी वाढ दिसून आली.
मागच्या आठवड्यात आघाडीवरील 10 पैकी 4 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य एकत्रितरित्या 81 हजार 151 कोटी रुपयांनी वाढले होते. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 156 अंकांनी वाढला होता. यामध्ये पाहता एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या बाजार मूल्यात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये एकंदरीत 76 हजार 622 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
यांच्या मूल्यात वाढ
आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवलमूल्य 28 हजार 495 कोटी रुपयांनी वाढत 8 लाख 90 हजार 191 कोटी रुपयांवर राहिले होते. यासोबतच एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवलमूल्य 23 हजार 579 कोटी रुपयांनी वाढत 12 लाख 82 हजार 848 कोटी रुपयांवर राहिले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 17804 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 31 हजार 773 कोटी रुपयांवर राहिले होते.
यांचे मूल्य घटले
इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य मात्र 23 हजार 314 कोटी रुपयांनी कमी झाले होते. याचप्रमाणे बाजार भांडवल मूल्यामध्ये नंबर एक वर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 16645 कोटी रुपयांनी कमी झाले होते. या योगे बाजार भांडवल मूल्य 18 लाख 38 हजार 721 कोटी रुपयांवर घसरले होते. जीवन विमा क्षेत्रातील कंपनी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 8760 कोटी रुपयांनी घटत 5 लाख 91 हजार 418 कोटी रुपयांवर राहिले होते.