For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात 81.15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

09:59 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात 81 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Advertisement

गतवर्षीच्या तुलनेत 6.48 टक्क्यांनी निकालात वाढ, हुबळीतील ए. विद्यालक्ष्मी राज्यात प्रथम

Advertisement

बेंगळूर : राज्यात बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 81.15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा एकूण 6,81,079 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 5,52,690 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 6.48 टक्क्यांनी वृद्धी दिसून आली आहे. गेल्यावर्षी बारावी परीक्षेचा निकाल 74.67 टक्के लागला होता. हुबळीच्या विद्यानिकेतन एससी पीयु कॉलेजची विद्यार्थिनी ए. विद्यालक्ष्मी हिने 600 पैकी 598 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बेंगळूरमधील कार्यालयात पत्रकार परिषदेत बुधवारी सकाळी बारावी परीक्षा-1 चा निकाल जाहीर करण्यात आला. निकालात मंगळूर जिल्ह्याने यंदा प्रथम स्थान पटकावले आहे. मंगळूर जिल्ह्याचा निकाल 97.37 टक्के लागला. तर 96.80 टक्के निकालासह उडुपी द्वितीय स्थानी तर विजापूर जिल्हा 94.89 टक्के निकालासह तिसऱ्या स्थानावर आहे. गदग जिल्हा शेवटच्या स्थानावर आहे. या जिल्ह्याचा निकाल 72.86 टक्के लागला आहे. 1,53,370 विद्यार्थी विशेष श्रेणीत म्हणजेच 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहे. प्रथम श्रेणीत (60 टक्के ते 84 टक्के) 2,89,733 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत (50 ते 59 टक्के ) 72,098 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

Advertisement

निकालात विज्ञान शाखा अव्वल असून कला शाखेचा 68.36 टक्के, वाणिज्य शाखेचा 80.94 टक्के आणि विज्ञान शाखेचा 89.96 टक्के निकाल लागला आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 84.87 टक्के आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 76.98 टक्के आहे. निकालात शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थी सरस ठरले आहेत. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 81.10 टक्के आहे. तर ग्रामीण विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 81.31 टक्के आहे. कन्नड माध्यमातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण प्रमाण 70.41 टक्के आणि इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.40 टक्के इतके आहे.

462 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के

यंदा 91 सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 26 अनुदानित आणि 345 विनाअनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर दोन सरकारी महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे 6 अनुदानित आणि 26 विनाअनुदानित महाविद्यालयांमधील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही.

फेरमूल्यमापनाची संधी

विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांविषयी शंका असतील तर उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मागवू शकतात. उत्तरपत्रिकेच्या फेरमूल्यमापनासाठीही अर्ज करू शकतात. उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मागविण्यासाठी एका विषयासाठी 530 रु. शुल्क असून 16 एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. स्कॅन प्रत डाऊनलोड करण्यासाठी 19 एप्रिलपर्यंत आणि फेरमूल्यमापन आाrण फेरगुणमोजणीसाठी 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत kseab.karnataka. gov.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल. फेरमूल्यमापनासाठी एका विषयाकरिता 1,670 रु. शुल्क आहे.

विजापूरचा वेदांत नावी कला शाखेतून राज्यात प्रथम

2024 सालातील बारावी परीक्षेत राज्यात कला विभागातून तीन, वाणिज्य आणि विज्ञान विभागातून प्रत्येकी एक विद्यार्थी प्रथम आले आहेत. हुबळीच्या विद्यानिकेतन एससी पीयु कॉलेजची विद्यार्थिनी ए. विद्यालक्षी हिने विज्ञान शाखेतून  600 पैकी 598 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर तुमकूरच्या विद्यानिधी आयएनडीपी पीयु कॉलेजचची विद्यार्थिनी ज्ञानवी एम. ही 597 गुण मिळवत वाणिज्य शाखेतून राज्यात प्रथम आली आहे. कला शाखेतून विजापूरच्या एस. एस. पीयु कॉलेजचा विद्यार्थी वेदांत ज्ञानोबा नावी, बेंगळूरच्या एनएमकेआरव्ही कॉलेजची विद्यार्थिनी मेधा डी. तसेच विजयनगर जिल्ह्याच्या कोट्टूर येथील आयएनडीपी कॉलेजची विद्यार्थिनी कविता बी. व्ही. या तिघांनी 600 पैकी 596 गुण मिळवत कला शाखेतून राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे.

जिल्हानिहाय निकाल

  • मंगळूर                 97.37
  • उडुपी                   96.80
  • विजापूर                 94.89
  • कारवार                 92.51
  • कोडगू                 92.13
  • बेंगळूर दक्षिण       89.57
  • बेंगळूर उत्तर         88.67
  • शिमोगा             88.58
  • चिक्कमंगळूर      88.20
  • बेंगळूर ग्रामीण    87.55
  • बागलकोट         87.54
  • कोलार            86.12
  • हासन              85.83
  • चामराजनगर     84.99
  • चिकोडी           84.10
  • रामनगर            83.58
  • म्हैसूर                83.13
  • चिक्कबळ्ळापूर   82.84
  • बिदर                81.69
  • तुमकूर             81.03
  • दावणगेरे            96
  • कोप्पळ            80.83
  • धारवाड            80.70
  • मंड्या             80.56
  • हावेरी             78.36
  • यादगिरी         77.29
  • बेळगाव          77.20
  • कलबुर्गी         75.48
  • बळ्ळारी        74.70
  • रायचूर         73.11
  • चित्रदुर्ग        72.92
  • गदग           72.86
Advertisement
Tags :

.