सरोवराखाली मिळाले 800 वर्षे जुने शहर
रेशीम मार्गाच्या इतिहासाशी निगडित रहस्यांची उकल होण्याची अपेक्षा
किर्गिस्तानमधील सर्वात मोठ्या सरोवराखाली सुमारे 800 वर्षे जुन्या एका शहराच्या खुणा मिळाल्या आहेत. वैज्ञानिक आणि पाणबुड्यांची एक टीम या शहरासंबंधी संशोधन करत आहेत. हे शहर किर्गिस्तानच्या इस्सिक-कुल सरोवरात तोरू-आयगिर भागानजीक आढळले आहे. या शहरात राहणारे लोक असे राहत होते, त्यांचा आहार कसा होता आणि हे शहर पाण्याखाली कसे पोहोचले याचा शोध लावण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. हे शहर रेशीम मार्गाच्या जुन्या व्यापारी मार्गांशी जोडलेले होते असे मानले जात आहे. या शोधामुळे मध्य आशियाच्या जुन्या इतिहासाविषयी नवी माहिती मिळू शकते.
शोधादरम्यान वैज्ञानिकांना मातीच्या भांड्यांचे तुकडे, प्राण्यांची हाडं, जुनी थडगी आणि इमारतीच्या खुणा मिळाल्या आहेत. या गोष्टींच्या तपासणीतून त्या काळात लोक कसे राहत होते आणि त्यांच्यादरम्यान कशाप्रकारचा व्यापार व्हायचा हे कळू शकते.

या शहराविषयी 19 व्या शतकापासून माहिती होती. परंतु आता वैज्ञानिक याची नीटप्रकारे तपासणी करत आहेत. याकरता वैज्ञानिक आणि पाणबुड्यांची टीम सरोवराच्या आत जाऊन जुन्या अवशेषांना पाहत आहे. हे टिकाण पाण्याच्या पृष्ठभागापासून सुमारे 14 मीटर खाली आहे. येथे शोधकार्य 2024 मध्ये सुरू झाले होते.
शहर किती मोठे होते आणि येथे कोणकोणत्या इमारती होत्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. याकरता सरोवराखाली मिळालेल्या जुन्या गोष्टी आणि इमारतींच्या खुणांचे अध्ययन केले जातेय.
रेशीम मार्गाशी कनेक्शन
रेशीम मार्ग जुन्या काळाच्या व्यापारी मार्गांचे एक जाळे होते. याच्याद्वारे चीनपासून युरोपपर्यंत सामग्री पोहोचविली जात होती. या मार्गांमधून रेशीम आणि इतर गोष्टींचा व्यापार व्हायचा. तसेच वेगवेगळ्या ठिकाणांचे लोक परस्परांची संस्कृती, धर्म आणि विचारांविषयी जाणून घेत होते. किर्गिस्तानचा भाग देखील या व्यापारी मार्गांशी जोडलेला होता. सरोवराखाली मिळालेल्या शहराच्या खुणांमधून त्या काळात येथे व्यापार कसा व्हायचा आणि लोकांचे जीवन कसे होते हे कळू शकेल अशी अपेक्षा वैज्ञानिकांना आहे.

भांडी अन् हाडांमुळे काय कळणार?
वैज्ञानिकांना सरोवराच्या खाली मातीच्या भांड्यांचे तुकडे आणि प्राण्यांची हाडं मिळाली आहेत. त्यांच्या तपासणीतून त्या काळात लोक काय खायचे आणि भांड्यांचा वापर कसे करायचे हे कळू शकते. भांड्यांच्या रचनेतून त्यांचा कालखंड जाणून घेण्यास मदत मिळू शकते. येथे दोन जुन्या दफनभूमी आणि एका मोठ्या इमारतीच्या खुणा मिळाल्या आहेत. ही इमारत प्रार्थनास्थळ होती का सार्वजनिक स्नानघर हे जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. याच्या संशोधनातून त्या काळातील लोक आणि त्यांच्या धर्माविषयी माहिती मिळू शकते.
हे शहर पाण्याखाली कसे पोहोचले हे वैज्ञानिक अद्याप शोधून काढू शकलेले नाहीत. भूकंप किंवा जमिनीत बदलामुळे असे घडले असण्याची शक्यता आहे. या भागात भूकंत होत असतात, याचमुळे एखाद्या नैसर्गिक घटनेमुळे हे शहर बुडाले होते का याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. परंतु शहर बुडण्याचे खरे कारण जाणून घेण्यासाठी अद्याप आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. येथे मिळालेली जुनी भांडी, हाडं आणि इमारतीच्या खुणांच्या तपासणीतून शहराच्या इतिहासाविषयी अधिक माहिती मिळू शकेल अशी अपेक्षा वैज्ञानिकांना आहे. यातून रेशीम मार्गाच्या काळात या भागात लोक कसे राहत होते आणि व्यापारात त्यांची भूमिका कोणती होती हे जाणून घेण्यास मदत मिळू शकते.
