80 परिवहन विमानांची होणार खरेदी
भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात पडणार भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी संरक्षण मंत्रालय लवकरच मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची खरेदी सुरू करू शकते. याकरता जागतिक स्तरावर तीन देशांच्या दिग्गज विमान उत्पादक कंपन्यांदरम्यान प्रतिस्पर्धा पहायला मिळू शकते. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून 80 मीडियम ट्रान्सपोर्ट विमानांच्या खरेदीला मंजुरी मिळू शकते. याचबरोबर पुढील वर्षी जानेवारीमध्ये या विमानांच्या खरेदी प्रक्रियेला सुरू करत निविदा जारी केली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय वायुदलाला विमाने पुरविण्यासाठी अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिन स्वत:चे सी-130जे सुपर हर्क्यूलिस, ब्राझीलची कंपनी एम्ब्रेयर स्वत:चे केसी-390 मिलेनियम विमान आणि युरोपीय कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेस स्वत:च्या ए-400एम विमानाचा प्रस्ताव ठेवणार आहे.
मेक इन इंडिया अंतर्गत करार
हा 40-80 विमानांचा खरेदी करार ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराच्या अंतर्गत होणार आहे. याचा उद्देश संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणे आहे. परिवहन विमानांच्या पुरवठ्याचा करार करणारी कंपनी भारतात विमानांच्या निर्मितीसाठी एक प्रकल्प स्थापन करणार आहे.
भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी
भारतीय वायुदलाला स्वत:च्या वाढत्या हवाई परिवहन आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी 18-30 टन कार्गो वाहून नेण्याची क्षमता असलेल्या नव्या परिवहन विमानांची आवश्यकता आहे. अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडसोबत मिळून या निविदेसाठी बोली लावली आहे. तर ब्राझीलची कंपनी एम्ब्रेयरने महिंदा समुहासोबत मिळून निविदा भरली आहे. तर एअरबसने अद्याप अधिकृत स्वरुपात स्वत:च्या भागीदारीची घोषणा केलेली नाही. एअरबस टीएएसएलसोबत मिळून वायुदलासाठी 56 सी-295 विमानांच्या आधुनिकीकरणासाठी 21,935 कोटी रुपयांच्या एका प्रकल्पावर काम करत आहे. संरक्षण क्षेत्रात एम्ब्रेयरने आतापर्यंत भारताला व्हीव्हीआयपी प्रवास आणि हवाई प्रारंभिक इशारा आणि नियंत्रण विमानाच्या स्वरुपात वापरासाठी 8 विमानांचा पुरवठा केला आहे.