बिहारमध्ये 80 घरांची जाळपोळ
नवादामधील घटना : गोळीबारामुळे तणाव, 15 जणांना अटक
वृत्तसंस्था/नवादा
बिहारमधील नवादा येथील दलित वसाहतीत गोळीबारानंतर स्थानिक गुंडांनी 80 घरांना आग लावली. या घटनेने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून दलित समुदायातील शेकडो लोक रातोरात बेघर झाले आहेत. लोकांमध्ये घबराट पसरली असून यावरून बिहारमध्ये राजकारण सुरू झाले आहे. सर्वप्रथम विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहार सरकारला धारेवर धरले. नवादा आगीच्या घटनेत आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती खासदार विवेक ठाकूर यांनी दिली. या घटनेचे कारण जमिनीचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवादा येथील दलित वसाहतीत बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी सुमारे 80 घरांना आग लावली. या भीषण घटनेदरम्यान आरोपींनी गोळीबार केला आणि लोकांना मारहाणही केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 5 पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हे प्रकरण नवादा जिह्यातील मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील दादौर येथील कृष्णा नगर दलित वसाहतीशी संबंधित आहे. यात अनेक जनावरेही दगावली आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अथक प्रयत्नाने आग आटोक्मयात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत घरात ठेवलेले साहित्य जळून राख झाले होते.
नितीशकुमार सरकारवर विरोधकांची टीका
दलित वसाहत स्थानिक गुंडांनी पेटवून दिल्याच्या घटनेनंतर राजकारण तापले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी नितीश सरकार आणि बिहारच्या एनडीए सरकारवर हल्लाबोल केला आहे. बसपा सुप्रीमो मायावती आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि बिहार सरकारवर टीका केली.
जमिनीबाबत वाद, प्रकरण न्यायालयात
या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. गावात मोठ्या भूखंडावर दलित कुटुंबे राहतात. या भूखंडाबाबत अन्य पक्षाशी वाद सुरू आहे. त्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा गुन्हेगारांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. आमची वसाहत सरकारी जमिनीवर आहे. नंदू पासवान यांना ही जमीन हस्तगत करायची आहे. त्याने साथीदारांसह येऊन जाळपोळ केली. यात आमचे खूप नुकसान झाले आहे. तसेच बुधवारी संध्याकाळी हल्लेखोरांनी 100 हून अधिक राऊंड फायर केले. त्यानंतर घरांवर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली, असे पीडित लक्ष्मीनिया देवी यांनी सांगितले. येथून पोलीस ठाणे दोन किलोमीटर अंतरावर असूनही अशी घटना घडणे दुर्दैवी असल्याचा दावा विस्थापितांनी केला आहे.