For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

विजेच्या धक्क्याने 8 कामगारांचा मृत्यू

06:31 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
विजेच्या धक्क्याने 8 कामगारांचा मृत्यू
Advertisement

राजस्थानमध्ये रस्ता निर्मितीवेळी मशीनचा वीजवाहिनीशी संपर्क आल्याने दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ झुंझुनू

राजस्थानच्या झुंझुनू जिह्यात सोमवारी विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने आठ जणांचा मृत्यू होण्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. झुंझुनू जिह्यात रस्ता निर्मितीचे काम सुरू असताना मशीनला उच्च-दाब असलेल्या तारेशी संपर्क आल्याने ही घटना घडली. यामध्ये इतर अनेक मजूर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी सोमवारी या घटनेची माहिती देत आठ कामगारांच्या मृत्यूला दुजोरा दिला.

Advertisement

झुंझुनू जिह्यातील छापोली गावात रस्त्याचे बांधकाम सुरू होते. रस्ते बांधकामादरम्यान खडी मिसळणारे एक मशीन रस्त्याजवळून जाणाऱ्या उच्च-दाब वाहिनीच्या संपर्कात आले. या प्रक्रियेत मशीनमधून वीज पसरली आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांना विजेचा धक्का लागला. ही वाहिनी 11,000 व्होल्टची होती. वायरला स्पर्श होताच मशीनमधून विजेचा प्रवाह वेगाने पसरल्याने तिथे काम करणाऱ्या कामगार त्याच्या विळख्यात आले. याप्रसंगी इतर अनेक कामगार गंभीर जखमी झाले. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी झुंझुनूमध्ये विजेचा धक्का लागून कामगारांच्या झालेल्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला. जखमींवर योग्य उपचार आणि पीडित कुटुंबांना तातडीने सर्वतोपरी मदत करण्याचे तसेच या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर दु:ख व्यक्त करत मृतांच्या वारसांना नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.

घटनेनंतर गावकरी संतप्त

आठ कामगारांच्या मृत्यूनंतर गावात दु:ख आणि संतापाचे वातावरण पसरले होते. या घटनेवरून गावकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आपला संताप व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री राजेंद्र गुढा आणि माजी आमदार शुभकरण चौधरी यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement
Tags :

.