पाकमधील स्फोटांत 8दहशतवादी ठार
तीन पोलिसांचाही मृत्यू : खैबर पख्तूनख्वा येथे दहशतवादी हल्ला
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात शुक्रवारी गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाईत आठ टीटीपी दहशतवादी ठार झाले. तसेच अन्य घटनेत तीन पोलीसही ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पहिली घटना कारवाई लक्की मारवत जिह्यातील वांडा शेख अल्लाह भागात झाली. या कारवाईत बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे आठ दहशतवादी ठार होण्यासोबतच पाचजण जखमी झाले. तसेच प्रांतातील हांगू शहरात दहशतवादविरोधी पथक गस्त घालत असताना झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात किमान तीन पोलीस ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी याला दहशतवादी हल्ला असे म्हटले आहे. पहिला स्फोट हांगूमधील एका पोलीस चौकीला लक्ष्य करून करण्यात आला. स्फोट इतका शक्तिशाली होता की आवाजामुळे जवळपासच्या अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले. पहिल्या स्फोटानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असताना दुसरा स्फोट घडवण्यात आला.
अन्य एका स्फोटाच्या घटनेत, शुक्रवारी दक्षिण वझिरिस्तानच्या सीमेवर असलेल्या टँक जिह्यातील एका नव्याने बांधलेल्या सरकारी मुलींच्या प्राथमिक शाळेत अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट केला. ही घटना सियाल गुल कोरोनाच्या गारा बुद्ध गावात घडली. सुदैवाने स्फोटाच्या वेळी इमारत रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.