सातव्या टप्प्यात 8 राज्ये, 57 मतदारसंघ
अठराव्या लोकसभेसाठीची सार्वत्रिक निवडणूक आता पूर्ण होण्याच्या मार्गाला लागली आहे. मतदानाच्या सात टप्प्यांमधील सहा पूर्ण झाले आहेत. सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान येत्या शनिवारी, अर्थात, 1 जूनला होणार आहे. या टप्प्यात 8 राज्यांमधील 57 मतदारसंघांमध्ये मतदान आहे. हा टप्पा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यासाठी ज्याप्रमाणे महत्वाचा आहे, तसा विरोधी पक्षांच्या आघाडीसाठीही आहे. अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार मागच्या सहा टप्प्यांमध्येच, ही निवडणूक कोण जिंकणार, हे स्पष्ट झालेले आहे. मात्र, मतगणना झालेली नसल्याने केवळ अनुमानांवरच चर्चा होत आहेत. ही निवडणूक अत्याधिक चुरशीची होत असेल, तर मात्र, सातवा टप्पा निर्णायक असू शकतो. या टप्प्यातील काही राज्ये शासनाधिष्ठित भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल मानली जात आहेत, तर काही राज्ये विरोधी पक्षांना साहाय्य करणारी असू शकतात. एकंदर, हा सातवा आणि अंतिम टप्पा ‘समतोल’ असल्याचे तज्ञांचे मत आहे. यातील राज्ये आणि मतदारसंघ यांचा हा आढावा...
मागच्या निवडणुकीतील स्थिती...
? सातव्या टप्प्यातील 57 मतदारसंघांमधील 25 मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकले होते. तर भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 34 मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. तर 15 जागांवर प्रादेशिक पक्ष आणि इतर पक्षांना मतदारांचा कौल होता.
? भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशात मोठे यश मिळाले होते. काँग्रेसला पंजाबमध्ये 8 जागा मिळाल्या होत्या. मात्र इतर राज्यांमध्ये एकही जागा हाती लागलेली नव्हती. प्रादेशिक पक्ष आणि इतरांना बऱ्यापैकी यश मिळाले होते.
कोणासाठी अधिक महत्व...
? हा टप्पा तसा सर्वच पक्षांसाठी महत्वाचा आहे, कारण कोणत्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या हाती देशाची सत्ता जाणार, हे या टप्प्यातील यशावरही अवलंबून राहणार आहे. जर मागच्या सहा टप्प्यांमध्ये निर्णय झाला असेल तर तो या टप्प्यातील मतदानानंतर अधिक स्पष्ट होईल, किंवा निवडणूक अधिक चुरशीचीसुद्धा होऊ शकते. प्रत्येक पक्षाने आणि आघाडीने आतापासूनच स्वत:च्या विजयाची भाकिते करण्यास प्रारंभ केला आहेच. सातव्या टप्प्यातील मतदानानंतर 4 जून उजाडेपर्यंत ही भाकिते अधिकच तीव्रपणे केली जातील. मतगणना पूर्ण झाल्यानंतर कोणता पक्ष किंवा आघाडी किती पाण्यात आहे, हे अंतिमत: स्पष्ट होणार आहे.
? सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यासाठी हा टप्पा अधिक महत्वाचा आहे कारण, या टप्प्यात मागच्या वेळी जिंकलेल्या जागा या पक्षाला आणि त्याच्या आघाडीला राखून ठेवायच्या आहेत. शिवाय जमल्यास पंजाबमध्ये काही अधिक जागांची प्राप्ती झाली तर करुन घ्यायची आहे. विरोधी पक्षांचे आव्हान याच्या नेमके उलट आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे शासनकर्ते आणि विरोधक यांच्यामधील ही रस्सीखेच आहे. तशी ती प्रत्येक टप्प्यातच होती. पण या टप्प्यात तिला निर्णायक स्वरुप प्राप्त झाल्याचे प्रचाराच्या तीव्रतेवरुन स्पष्ट होत आहे.
सातव्या टप्प्यातील राज्ये आणि मतदारसंघ...
- बिहार
? नालंदा (भारतीय जनता पक्ष), पाटणा साहिब (भारतीय जनता पक्ष), पाटलीपुत्र (भारतीय जनता पक्ष), आरा (भारतीय जनता पक्ष), बक्सर (भारतीय जनता पक्ष), सासाराम (भारतीय जनता पक्ष), काराकट (भारतीय जनता पक्ष), जहानाबाद (भारतीय जनता पक्ष)
- हिमाचल प्रदेश
? कांगडा (भारतीय जनता पक्ष), मंडी (भारतीय जनता पक्ष), हमीरपूर (भारतीय जनता पक्ष), शिमला (भारतीय जनता पक्ष)
- उत्तर प्रदेश
? वाराणसी (भारतीय जनता पक्ष), महाराजगंज (भारतीय जनता पक्ष), गोरखपूर (भारतीय जनता पक्ष), कुशीनगर (भारतीय जनता पक्ष), देवरिया (भारतीय जनता पक्ष), बन्सगाव (भारतीय जनता पक्ष), घोशी (भारतीय जनता पक्ष), गाझीपूर (समाजवादी पक्ष), बलिया (भारतीय जनता पक्ष), सालेमपूर (भारतीय जनता पक्ष), चंदौली (भारतीय जनता पक्ष), मिर्झापूर (बहुजन समाज पक्ष), रॉबर्टस्गंज (भारतीय जनता पक्ष)
- पंजाब
? गुरुदासपूर (भारतीय जनता पक्ष), अमृतसर (काँग्रेस), खाडूर साहिब (काँग्रेस), जालंदर (भारतीय जनता पक्ष), होशियारपूर (आम आदमी पक्ष), आनंदपूर साहिब (काँग्रेस), लुधियाना (काँग्रेस), फतेगड साहिब (आम आदमी पक्ष), फरीदकोट (काँग्रेस), फिरोझपूर (काँग्रेस), भटींडा (शिरोमणी अकाली दल), संगरुर (काँग्रेस), पतियाळा (काँग्रेस)
- ओडीशा
? मयूरभंज (बिजू जनता दल), बालासोर (बिजू जनता दल), भद्रक (बिजू जनता दल), जाजपूर (भारतीय जनता पक्ष), केंद्रपाडा (बिजू जनता दल), जगत्सिंहपूर (बिजू जनता दल)
- पश्चिम बंगाल
? डमडम (तृणमूल काँग्रेस), बरासत (तृणमूल काँग्रेस), जयनगर (तृणमूल काँग्रेस), माथूरपूर (तृणमूल काँग्रेस), डायमंड हार्बर (तृणमूल काँग्रेस), जाधवपूर (भारतीय जनता पक्ष), कोलकाता दक्षिण (तृणमूल काँग्रेस), कोलकाता उत्तर (भारतीय जनता पक्ष)
- झारखंड
? गो•ा (भारतीय जनता पक्ष), दुमका (भारतीय जनता पक्ष), राजमहाल (भारतीय जनता पक्ष)
- चंदीगढ
? चंदीगढ (भारतीय जनता पक्ष)