For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकाच कुटुंबातील 8 जणांना जलसमाधी

06:41 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
एकाच कुटुंबातील 8 जणांना जलसमाधी
Advertisement

भटकळ तालुक्यातील दुर्घटना : शिंपले काढताना बुडून मृत्यू

Advertisement

प्रतिनिधी/ कारवार

कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुक्यातील सारदहोळे-शिरालीच्या इतिहासात  रविवारचा दिवस काळा आणि अतिक्रूर ठरला. कारण तट्टीहक्कळू येथे शिंपले काढण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. तिघेजण बुडून बेपत्ता झाले आहेत. तर अन्य तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. वाचविलेल्या तिघा जणांवर भटकळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी मणीपालला हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही भीषण दुर्घटना रविवारी दुपारी घडली आहे.

Advertisement

 

या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दगावलेल्यांची नावे मालती जेट्टप्पा नाईक (वय 38), लक्ष्मी मादेव नाईक (वय 40), लक्ष्मी शिवराम नाईक (वय 40), लक्ष्मी आण्णाप्पा नाईक (वय 50), लक्ष्मी मादेव नाईक (वय 40), ज्योती नागप्पा नाईक (वय 38), मास्तम्मा मंजुनाथ नाईक (वय 45) आणि उमेश मंजुनाथ नाईक (वय 25) अशी आहेत. बुडून बेपत्ता झालेल्यांची नावे मादेव बैरप्पा नाईक (वय 40), मंजम्मा गोयडू नाईक (वय 30), आणि नागरत्ना परमेश्वर नाईक (वय 38) अशी आहेत. वाचविण्यात आलेल्यांची नावे मादेवी मंजुनाथ नाईक (वय 60), लता जगदीश नाईक (वय 38) आणि नागरत्ना ईश्वर नाईक (वय 40) अशी आहेत.

या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, भटकळपासून 4 कि. मी. अंतरावरील सारदहोळे-शिराली येथील 14 जणांचा गट (12 महिला, दोन पुरुष) अळवीकोडी ब्रिजजवळ शिंपले काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील अनेक ठिकाणी श्रमजीवी समाजातील लोक शिंपले काढण्यासाठी जाणे ही काय नवीन बाब नव्हे. तथापि, रविवारी दगडावर चिकटून असलेले शिंपले काढत असताना पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली आणि 14 पैकी 14 जण पाण्यात बुडाले. यापैकी एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व आठ मृतदेह सापडले आहेत. तिघेजण बुडून बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. अन्य तिघांना स्थानिकांनी आणि पोलिसांनी वाचविले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेह भटकळ येथील सरकारी रुग्णालयात आणि मुर्डेश्वर येथील आर. एन. एस. रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. ते सर्वजण मासेमारी समाजाचे नव्हे तर नामधारी समाजाचे लोक होते.

घटनास्थळी मोठी गर्दी

घटनेची माहिती मिळताच भटकळचे माजी आमदार सुनील नाईक, भाजप नेते गोविंद नाईक यांच्यासह हजारो नागरिकांनी घटनास्थळी आणि मृतदेह ठेवलेल्या रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. मृतांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी केलेला मोठा आक्रोश सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल अतिव शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. हल्याळ-जोयडाचे आमदार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे, शिवराम हेब्बार आदींनी दुर्घटनेबद्दल दुखवटा व्यक्त केला आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून यंत्रणा जुंपण्यात आली आहे.

सात पैकी चार महिलांची नावे ‘लक्ष्मी’

बुडून मृत्यू झालेल्या सात पैकी चार महिलांची नावे लक्ष्मी अशी आहेत. काळाने घरच्या लक्ष्मीलाच हिरावून नेल्याने उपस्थितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दुर्घटनेत सापडलेल्या 14 पैकी 12 महिलांची आणि दोन पुरुषांची आडनावे नाईक अशी आहेत.

 अशी घडली दुर्घटना...

सारदहोळे-शिराली येथील 14 नागरिक पल्लीहोळे दाटून शिंपले (दगडी शिंपले) काढण्यासाठी गेले होते. जाताना ओहोटी होती. मात्र परत येत असताना भरती होती. त्यांना भरती आणि ओहोटीची सवय होती. तथापि काळ टपून बसला होता. भरतीच्या पाण्यातून वाट काढताना एकाचा तोल चुकला आणि खोल पाण्यात अडकला. त्याला वाचविताना दुसरा अडकला आणि नंतर एकमेकांना वाचवायला जाऊन सर्वजण खोल पाण्यात अडकले.

पंतप्रधानांकडून प्रत्येक दोन लाखांची मदत जाहीर

कर्नाटकातील कारवार जिल्ह्याच्या भटकळ भटकळजवळील तट्टीहक्कळू समुद्रकिनाऱ्यावर एकाच कुटुंबातील आठ जणांचा रविवारी बुडून मृत्यू झाला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख ऊपये तर घटनेत जखमी झालेल्यांना 50,000 ऊपयांची मदत जाहीर केली आहे.

Advertisement
Tags :

.