Ambenali Ghat Accident | आंबेनळी घाटात ८ जणांचा अंत, पण मागे उरलेल्या कुटुंबांचं काय? आसगाव-मर्दै भेटीनंतर शशिकांत शिंदेंचा मोठा खुलासा
आंबेनळी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शशिकांत शिंदे यांचा दिलासा
एकंबे : आंबेनळी घाटातीलभीषण अपघातातील मुतांच्या कुटुंबीयांची आसगाव व मर्दै (ता. सातारा) येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. भेटीदरम्यान कुटुंबीयांनी भविष्यातील उदरनिर्वाहाबाबतची चिंता व्यक्त केली. त्यावर शशिकांत शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबातील पात्र तरुण व तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काही खासगी पण आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्यांच्या संचालकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. तसेच त्यांना रोजगाराची हमी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जावलीचे माजीआमदार सदाशिवराव सपकाळ, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हणमंतराव चवरे उपस्थित होते.
महाबळेश्वरनजिकच्या आंबेनळी घाटात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांपैकी काही जण आपल्या कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या निधनामुळे संबंधित कुटुंबांपुढे आर्थिक आणि सामाजिक संकट उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तसे त्यांना पत्र दिले असल्याचे शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले, ऐन तारुण्यात या सर्व तरुणांवर काळाने दुर्दैवी घाला घातला आहे. या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावले गेले आहेत. या कुटुंबांच्या वेदना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. मात्र संकटाच्या काळात त्यांना एकटे पडू देणार नाही. रोजगार, आर्थिक मदत आणि शासनस्तरावरील सर्व शक्य सहाय्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे.
मुख्यमंत्री निधीतून मदतीची अपेक्षा
महाराष्ट्रात कोठेही मोठा अपघात झाल्यास अथवा दुर्दैवी घटना घडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर करतात. आंबेनळी घाटातील अपघातामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना अद्यापही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोणत्याही स्वरूपाची मदत मिळालेली नाही. अपघातानंतर सरकारमधील मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गावात येऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. त्यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.