8 पाकिस्तानी नागरिकांची इराणमध्ये हत्या
वृत्तसंस्था/ लाहोर
इराणमध्ये 8 पाकिस्तानी नागरिकांची हत्या झाल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. दक्षिणपूर्व इराणमध्ये 8 पाकिस्तानी नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. हे सर्व लोक सिस्तान-बलुचिस्तान प्रांताच्या मेहरस्तानमध्ये मारले गेले आहेत. हा भाग पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे.
तेहरान येथील पाकिस्तानचा दूतावा आणि जाहिदान येथील वाणिज्य दूतावास इराणच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून या हत्यांप्रकरणी तपास करत आहे. 8 नागरिकांचे मृतदेह मायदेशी आणले जात असल्याचे पाकिस्तानच्या सरकारने सांगितले आहे.
तर मृत नागरिकांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. तसेच त्यांच्या हत्येमागील कारणही उघड झालेली नाही. मागील वर्षी देखील असेच प्रकरण समोर आले होते. त्यावेळी इराणने पाकिस्तानातील जैश अल अदल समुहाच्या दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. तर प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने इराणमधील बलूच लिबरेशन फ्रंट आणि बलूच लिबरेशन आर्मीच्या ठिकाणांवर हल्ले केले होते. हे सर्व दहशतवादी समूह पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात सक्रीय आहेत. दोन्ही क्षेत्रं दहशतवादाने प्रभावित आहेत.