८ नव्या आयपीओत गुंतवणुकीची संधी
मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस, ज्युनीपर ग्रीनसह इतर कंपन्यांचा समावेश : 7 कंपन्या होणार सुचीबद्ध
वृत्तसंस्था, मुंबई
27 जुलैपासून सुरु झालेल्या आठवड्यात एकंदर 8 नवे आयपीओ गुंतवणूकीसाठी खुले होणार आहेत. यात मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस व ज्युनीपर ग्रीन एनर्जी यांचा मेनबोर्ड गटात समावेश असणार आहे. याशिवाय नव्या आठवड्यात आधीपासून खुल्या झालेल्या चार आयपीओंमध्ये पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे. तर 7 कंपन्यांचे समभाग बाजारात सुचीबद्ध होणार आहेत.
नवे खुले होणारे आयपीओ
प्रॉपशॉप इव्हेंटस् अँड एक्झीबिशन्स : कंपनी आयपीओ सादर करणार असून याअंतर्गत 28.57 कोटी रुपये उभारणार आहे. 27 जुलै रोजी खुला झालेला आयपीओ 29 जुलैपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. 65-69 रुपये प्रति समभाग अशी इशु किंमत कंपनीने अंतिम केली असून लॉटमध्ये 2 हजार समभागांचा समावेश असणार आहे. एनएसई एसएमईवर समभाग 3 ऑगस्ट रोजी सुचीबद्ध होऊ शकतो.
अॅडव्हान्स टेक्नोफोर्ज : 27 जुलै रोजी आयपीओ खुला झाला असून 29 जुलै ही गुंतवणुकीसाठी अंतिम तारीख असणार आहे. 95 रुपये प्रति समभाग अशी इशु किमत निश्चित करण्यात आली असून एका लॉटमध्ये 1200 समभागांचा समावेश असणार आहे. बीएसई एसएमईवर समभाग 3 ऑगस्ट रोजी सुचीबद्ध होऊ शकतो. आयपीओतून कंपनी 24.03 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
पूजा प्रीसिशन: कंपनी आयपीओतून 159.83 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओ 28 जुलै रोजी खुला होणार असून 30 जुलैला बंद होणार आहे. 285 ते 301 रुपये प्रति समभाग अशी इशु किमत निश्चित करण्यात आली आहे. लॉटमध्ये 400 समभागांचा समावेश असेल. बीएसई एसएमईवर समभाग 4 ऑगस्टला सुचीबद्ध होऊ शकतो.
मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस : 9275 कोटी रुपयांचा कंपनीचा आयपीओ 29 जुलैला खुला होत आहे. 560 ते 590 रुपये प्रति समभाग अशी इशु किमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 25 समभाग असतील. 5 ऑगस्टला समभाग एनएनई व बीएसईवर सुचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
एच. आर. हायजिन प्रोडक्टस् : सदरचा आयपीओ 29 जुलैला खुला होऊन 31 जुलैला बंद होईल. या आयपीओतून कंपनी 53.95 कोटी रुपये उभारणार आहे. 83 ते 88 रुपये प्रति समभाग अशी इशु किमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 1600 समभागांचा समावेश असेल. 5 ऑगस्टला समभाग बीएसई एसएमईवर सुचीबद्ध होऊ शकतो.
ज्युनीपर ग्रीन एनर्जी : सदरच्या आयपीओतून कंपनी 1800 कोटी रुपयांची उभारणी करु इच्छिते. 30 जुलै रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून तो 3 ऑगस्ट रोजी बंद होणार असल्याचे समजते. समभागाची इशु किमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. समभाग एनएसई व बीएसईवर 6 ऑगस्ट रोजी सुचीबद्ध होऊ शकतो.
धवल पॅकेजिंग : सदरचा आयपीओ हा 36.36 कोटी रुपयांचा असणार आहे. 30 जुलै रोजी खुल्या होणाऱ्या या आयपीओत गुंतवणूकदारांना 3 ऑगस्टपर्यंत गुंतवण्याची संधी असणार आहे. बीएसई एसएमईवर समभाग 6 ऑगस्टला सुचीबद्ध होऊ शकतो.
फ्युजन क्लासरुम एज्युटेक : कंपनी आयपीओतून 39.04 कोटी रुपये उभारणार आहे. 31 जुलै रोजी खुला होणारा आयपीओ 4 ऑगस्ट रोजी बंद होईल. 151 ते 159 रुपये प्रति समभाग अशी इशु किमत असेल. एका लॉटमध्ये 800 समभाग असतील. 7 ऑगस्ट रोजी समभाग बीएसई एसएमईवर सुचीबद्ध होऊ शकतो.