8 आवश्यक औषधे महागणार
50 टक्क्यांनी वाढणार किंमत : अस्थमा, टीबी, ग्लुकोमासारख्या आजारांचे औषध सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीने (एनपीपीए) 8 शेड्यूल औषधांच्या कमाल किमतीला वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधांचा वापर अस्थमा, क्षयरोग, ग्लूकोमा सोबत अनेक अन्य आजारांवरील उपचारासाठी केला जातो. एनपीपीएने 8 औषधांच्या 11 शेड्यूल्ड फॉर्म्युलेशनच्या कमाल किमतीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. यापूर्वी एनपीपीएने 2019 आणि 2020 मध्ये अनुक्रमे 21 आणि 9 फॉर्म्युलेशन औषधांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला होता.
स्लो हार्ट रेटवरील उपचारासाठी वापरण्यात येणारे एट्रोपिन इंजेक्शन, क्षयरोगाच्या उपचरासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन पाउडर स्ट्रप्टोमायसिन, अस्थमाचे औषध साल्बुटामॉल, ग्लुकोमाच्या उपचारात वापरण्यात येणारे पिलोकार्पिन, यूरिन ट्रॅक्ट इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे सेफॅड्रोक्सिल टॅबलेट, थॅलेसीमियाच्या उपचारासाठी वापरले जाणारे डेफेरोक्सामाइन इंजेक्शन आणि 300 एमजीची लिथियम टॅबलेट आता महागणार आहे.
औषध उत्पादकांकडून सातत्याने किमतीत वाढ करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. याकरता कंपन्यांकडून एपीआयच्या किमतीत वाढ झाल्याने औषधांसाठीचा खर्च वाढल्याचा दाखला देण्यात आला होता. काही औषधांची उपलब्धता नसल्याने ती बंद करण्यासाठीही कंपन्यांनी अर्ज केले आहेत. यातील बहुतांश औषधे स्वस्त असून देशाच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमासाठी फर्स्ट लाइन उपचारादाखल वापरली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.