For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये 8 नक्षलींना कंठस्नान

06:04 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये 8 नक्षलींना कंठस्नान
Advertisement

चकमकीत एक जवान हुतात्मा : सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाला मोठे यश

Advertisement

वृत्तसंस्था/ नारायणपूर

छत्तीसगडमधील नारायणपूर भागातील अबुझमड येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. या चकमकीत लष्कराचा एक जवानही हुतात्मा झाला आहे. सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सायंकाळपर्यंतही चकमक सुरू होती. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर एकूण 38 लाख ऊपयांचे बक्षीस होते. छत्तीसगडच्या नारायणपूर जिह्यात सुरक्षा दलांनी सहा नक्षलींचा खात्मा केल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली आहे.

Advertisement

नारायणपूर जिह्यातील माड भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दलाने विशेष शोधमोहीम हाती घेतली होती. याचदरम्यान जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झडली. अबुझमदमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत शनिवारी दुपारपर्यंत एकूण 8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली असून कर्तव्य बजावताना लष्कराचा एक जवानही हुतात्मा झाल्याचे सांगण्यात आले. तसेच अन्य दोन जवान जखमी झाले आहेत.

अबुझमड हा एक डोंगराळ आणि वनक्षेत्र असलेला भाग असून तो नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येतो. भौगोलिकदृष्ट्या हा मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असून हा भाग नक्षलवाद्यांच्या कारवायांचे केंद्र मानला जातो. येथे नक्षलवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून प्राप्त झाल्यानंतर नारायणपूर, कांकेर, दंतेवाडा आणि कोंडागाव या चार जिह्यांतील सुरक्षा जवानांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर पाठविण्यात आले होते. याचदरम्यान शनिवारी सकाळी अबुझमडच्या जंगलात गोळीबार सुरू झाला. यावेळी झालेल्या संघर्षात दुपारपर्यंत 8 नक्षलींना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.

बुधवारपासून मोहीम

नक्षलवाद्यांविऊद्ध चालवली जात असलेली विशेष मोहीम 12 जून रोजी सुरू करण्यात आली होती. जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) 53 व्या बटालियनच्या जवानांनी विशेष मोहिमेत सहभाग घेतला होता. गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात शोधमोहीम राबविण्यात आली होती. याचदरम्यान संयुक्त कारवाईला मोठे यश मिळाले आहे.

विजापूर जिल्ह्यात नक्षलींनी पेरलेले आयईडी जप्त

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात एका बांधकामाधीन रस्त्याच्या कडेला नक्षलवाद्यांनी पेरलेली तीन अत्याधुनिक स्फोटक यंत्रे (आयईडी) सुरक्षा दलांनी शनिवारी जप्त केली, असे पोलिसांनी सांगितले. नायमेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गडामली आणि कादर गावांदरम्यान आयईडी पेरण्यात आले होते. या भागात सध्या रस्ते बांधणीचे काम सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर कमांड स्विच यंत्रणा वापरून स्फोटके पेरण्यात आली होती.  नक्षलविरोधी कारवायांमध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी अनेकदा स्फोटके पेरतात, असे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.