अमेरिकेत एकाच परिवारातील 8 जणांची हत्या
मृतांमध्ये 4 मुलांचा समावेश : आरोपीकडून आत्महत्या
वृत्तसंस्था, बिलिंग्स
अमेरिकेच्या मोंटाना प्रांतातील बिलिंग्स शहरात एकाच परिवारातील 8 जणांची हत्या करण्यात आली आहे. परिवाराचे लोक एकत्र डिनर करत असताना ही घटना घडली आहे. आरोपीने सर्वांना गोळ्या घातल्यावर घराला आग लावली आणि मग स्वत:वरही गोळी झाडून घेतली आहे.
गोळीबारात मृत्युमुखी पडणारे लोक एकाच परिवारातील चार पिढ्यांशी संबंधित होते. यात 4 मुलांचाही समावेश आहे. पोलिसांना संबंधित घरात गोळीबार होत असल्याची माहिती मिळाली होती, ज्यानंतर पोलीस तेथे पोहोचले असता त्यांना घराच्या मागे गोळीबार सुरु असल्याचा आवाज ऐकू आला. घराबाहेर एक इसम जखमी अवस्थेत आढळून आला, त्याला रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्याचा मृत्यू झाला. हाच इसम या घटनेतील आरोपी होता असे मानले जात आहे.
तत्पूर्वी घरात आग वेगाने फैलावत असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना त्वरित आता जाता आले नव्हते. आगीत घर जळून खाक झाल्याने पोलिसांना गोळीबाराच्या घटनेचे पुरावे जमविण्यास अडचणी येत आहेत.
संशयित इसम परिवाराच्या सदस्यांना ओळखत होता, परंतु हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही असे पोलिसांचे सांगणे आहे. आग कशी लागली याचा तपास सध्या केला जात आहे. तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणाशी निगडित काही माहिती उघड केली जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सागिंतले आहे.