For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Delhi Malviya Nagar Fire| वडिलांच्या उपचाराची आशा बनली मृत्यूचा सापळा; गुरुग्रामच्या एकाच कुटुंबातील ८ जणांचा भयंकर शेवट

05:36 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
delhi malviya nagar fire  वडिलांच्या उपचाराची आशा बनली मृत्यूचा सापळा  गुरुग्रामच्या एकाच कुटुंबातील ८ जणांचा भयंकर शेवट
Advertisement

                      दिल्लीतील भीषण हॉटेल आगीत एका कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

Advertisement

नवी दिल्ली: बुधवारी सकाळी राजधानी दिल्ली सुन्न झाली, जेव्हा मालवीय नगरमधील लेमन ग्रीन हॉटेलमधून एकामागून एक २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण आगीने अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली. यात सर्वात दुर्दैवी कहाणी ठरली ती गुरुग्रामच्या अग्रवाल कुटुंबाची. वडिलांच्या उपचाराच्या आशेने दिल्लीत पाऊल ठेवणाऱ्या विवेक अग्रवाल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ८ जणांचा या आगीत कोळसा झाला. रुग्णालयाच्या जवळ राहाता यावे म्हणून घेतलेला हॉटेलचा आसरा त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनेल, असा विचार शेजाऱ्यांनी किंवा नातेवाईकांनी स्वप्नातही केला नव्हता.

आगीच्या ज्वालांनी जेव्हा हॉटेलला वेढले, तेव्हा विवेक अग्रवाल यांनी आपले नातेवाईक पुनीत गुप्ता यांना फोन लावला. "भाऊ, आपण कदाचित वाचणार नाही," हा विवेक यांचा अत्यंत घाबरलेला आवाज पुनीत यांच्या कानात अजूनही घुमतो आहे. चेहऱ्यावर ओला रुमाल बांधून श्वास घेण्याचा प्रयत्न करण्याचे सल्ले पुनीत फोनवरून देत राहिले आणि दिल्लीकडे धावत सुटले. परंतु, ते दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच धूर आणि आगीने विवेक, त्यांची पत्नी, दोन निष्पाप मुली, आई आणि काका-काकूंचा श्वास कायमचा रोखला होता. एका खाजगी कंपनीत सीए असणारे विवेक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आज या दुर्दैवी आत्म्यांचे मृतदेह दिल्लीहून गुरुग्रामला रवाना केले जात असून, या आगीने व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.