अट्टल घरफोड्याकडून 8 लाखांचा ऐवज जप्त
मारिहाळ पोलिसांची कारवाई : पाच घरफोड्यांची कबुली
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या एका युवकाला मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अट्टल घरफोड्याने पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
बसप्पा ऊर्फ फरारी बश्या मारुती करकाळी (वय 36) रा. चंदूर, ता. बेळगाव असे त्याचे नाव आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ नायक, चंद्रशेखर, हवालदार बी. एन. बळगण्णावर, बी. बी. कट्टी, हणमंत यरगुंद्री, टी. जी. सुळकोड, चन्नाप्पा हुनचाळ, आर. एच. तळवार, तांत्रिक विभागातील रमेश अक्की आदींनी ही कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. बसाप्पा ऊर्फ फरारी बश्या हा पोलिसांच्या काळ्या यादीतील अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी त्याने उद्यमबाग, कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही चोऱ्या केल्या आहेत. ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांच्या तपासासाठी मारिहाळ पोलिसांच्या दोन पथकांनी केलेल्या कारवाईत तो जाळ्यात अडकला आहे.
मोदगा, होनियाळ, हुदली, खणगाव केएच येथे त्याने चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी त्याच्या साथीदारालाही अटक झाली आहे. मारिहाळ पोलिसांनी सुळेभावी-खणगाव रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजजवळ बुधवार दि. 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.50 वाजण्याच्या सुमारास संशयावरून बसाप्पाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
बसवराजजवळून 6 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोने, 50 हजार रुपये किमतीची चांदी व गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण 7 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मारिहाळ पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.