बस दरीत कोसळून हिमाचलमध्ये 8 ठार
शिमलाहून कुपवीला जाणाऱ्या खासगी बसला अपघात : 50 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था/ नाहान (हिमाचल प्रदेश)
हिमाचल प्रदेशात शुक्रवारी एक खासगी बस खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघातावेळी बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरिपूरधार बाजाराजवळ जीत कोचेसची एक खासगी बस रस्त्यावरून घसरून 60 मीटर खोल दरीत पडल्याने हा अपघात झाला.
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिह्यातील रेणुकाजी विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याचे उपमुख्यमंत्री आणि वाहतूक मंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सांगितले. तसेच बस दरीत कोसळल्याची माहिती मिळताच सिरमौरचे पोलीस अधीक्षक नेगी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातग्रस्त बस शिमलाहून कुपवीला जात होती. अपघाताच्या वेळी बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्याचे वृत्त आहे. मदत व बचावकार्यासाठी स्थानिकांचा मोठा जमाव घटनास्थळी पोहोचला होता. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत पोलीस येण्यापूर्वीच लोकांना दरीतून बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.